पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई दौरा केला. या दौऱ्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघरमधील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन झाले. त्या अगोदर मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मोदी यांनी ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. तिन्ही जहाजांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन झाल्यावर त्यांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा होता. या दौऱ्यात महायुतीच्या आमदारांशी, राज्यातील मंत्र्यांशी सुसंवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर कोणत्याही प्रकारची टीका न करता त्यांचा उल्लेख करणेही टाळले. निवडणुका संपल्या, वादही संपले. आता सुसंवादातून राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे देशाचा, राज्याचा विकास करू असा सकारात्मक संदेश पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यातून दिला.
महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी विरोधकांनाही आपलेसे करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला. सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना जनसेवेसाठी व्यस्त असणाऱ्या आमदारांना त्यांनी सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या प्रकृतीकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे, यासाठी योगा किंवा तत्सम व्यायाम करा. मी स्वतः पहाटे उठून दररोज योगा करतो, असे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी आजच्या धकाधकीच्या काळात व्यस्त असलेल्या वेळापत्रकामध्ये ‘आरोग्य हीच खरी धनसंपदा’ असल्याचे आमदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. कारण जनसेवा करताना ते आपल्या भोजनाच्या नियमित वेळाही पाळत नाहीत. दररोज वेळीअवेळी भोजन केल्यामुळे शरीराची हेळसांड होते, विविध आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा प्रकृतीच्या तक्रारीकडे कानाडोळा करत आमदार मंडळी शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ न दवडता औषधांच्या दुकानातून मेडिसीन घेऊन दिवस ढकलतात. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या आमदारांचे समयानुरूप बौद्धिक घेतले. जनसेवा करा; परंतु ही जनसेवा करताना शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका, असा लाखमोलाचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच महायुतीच्या आमदारांशी, मंत्र्यांशी सुसंवाद साधताना सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, दरवर्षी मेडिकल चाचणी करून घ्या. घरातील कुटुंबाकडे विशेष लक्ष द्या, सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा, असे सांगितले. सार्वजनिक जीवनात व्यस्त कार्यक्रम असल्याने अनेकदा आपल्याच कुटुंबाकडे आपला संपर्क तुटलेला असतो, फारसा सुसंवाद होत नाही. त्यामुळे जनसामान्यांइतकेच आपले कुटुंबीयही महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी आमदारांना स्वत:च्या घरच्यांचीही काळजी घेण्याचा सल्ला दिला. राजकारणाबाबत बोलताना, निवडणुका संपल्या, वाद मिटले. निवडणुकांपुरते वाद-विवाद होतात. आता त्या वादविवादांवर मूठमाती टाकून पुढे वाटचाल करणे, एकत्रित येऊन मतभेद विसरून विकासाबाबत कार्यरत होऊन मतदारसंघाला, राज्याला व देशाला प्रगतिपथावर घेऊन जाण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला. अनेकदा मतदारसंघात ज्या ठिकाणी मतदान कमी मिळाले, त्या भागात विकासकामे करण्यास लोकप्रतिनिधी हात आखडता घेत असतात. याउलट ज्या भागातून अधिकाधिक मतदान मिळाले आहे, त्या भागात अधिकाधिक सुविधा देताना ती व्होट बँक सुरक्षित करण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो. त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाबाबतचा असमतोल दिसून येतो. हे चित्र टाळण्यासाठी निवडणुकीमध्ये मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करून त्यांच्यासोबत विरोधकांनाही आपलेसे करून घेण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी यावेळी महायुतीच्या आमदारांना दिला.
राज्यात महायुतीचे सरकार असून भाजपाला शिवसेना व राष्ट्रवादीच्या साथीने राज्यकारभार करावा लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या. गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपले सगळ्यांकडे लक्ष असले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय धुळवड साजरी केली जात असून महायुती तसेच महाविकास आघाडीतील नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलखेक केली जात आहे. कोणत्याही जाहीर कार्यक्रमातून एकमेकांवर टीका करण्याची संधी कोणी सोडत नाही. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये सलोखा निर्माण न होता दुरावा वाढत चालला आहे. हा दुरावा विकासकामांवर परिणाम करणारा असल्याचे ओळखून पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनाही आपलेसे करण्याचा सल्ला देताना नजीकच्या भविष्यात सकारात्मक राजकारणावर भर दिला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्षपणे निर्देश दिले आहेत.
आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी शिवछत्रपतींचे नाव घेत आपले राजकारण सांभाळले आहे; परंतु पंतप्रधान मोदी हे मनापासून शिवछत्रपतींचा आदर करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यक्रमात शिवछत्रपतींचे नाव घेत त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याचा सल्ला देत असतात. ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण करत असताना त्यांनी आपल्या भाषणातून शिवछत्रपतींचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवे सामर्थ्य आणि दूरदृष्टी दिली. सागरी सुरक्षेसाठी नौदलाचे महत्त्व त्या काळात शिवछत्रपतींनी अधोरेखित केले असल्याचे मोदी यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला व विरोधकांनाही आपलेसे करण्याचे दिलेले निर्देश पाहता राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये आगामी काळात सुसंवादावर भर दिला जाणार असल्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्यादरम्यान दिले आहेत.