Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

NEET-UG : एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये होणार परीक्षा

NEET-UG : एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये होणार परीक्षा

नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी परीक्षा अर्थात नीट (यूजी) आता ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. एकाच दिवशी एकाच शिफ्ट मध्ये पेन आणि पेपर पद्धतीने या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ही घोषणा केली.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पेन आणि पेपर घ्यायची की नाही यावर शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी एनटीएने अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) ठरवल्यानुसार, नीट युजी 2025 ची परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने (ओएमआर आधारित) एकाच दिवस आणि एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येईल, असे अधिसूचनेत नमूद केले आहे.

गेल्या वर्षी नीट परीक्षेत कथित पेपर फुटीमुळे देशभरात गोंधळ झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे, 2025 ची नीट परीक्षा एमबीबीएस, बीएएमएस बीयुएमएस बीएचएमएस यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा असेल. परीक्षेचा कालावधी 3 तास 20 मिनिटांचा असेल. परीक्षेत बहुपर्यायी स्वरूपाचे (एमसीक्यू) 200 प्रश्न असतील, ज्यापैकी उमेदवारांना 180 प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. प्रत्येक योग्य उत्तरास 4 गुण मिळतील, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल. ही परीक्षा 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये घेतली जाईल. तर परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा