Friday, October 24, 2025
Happy Diwali

J.J. Hospital : जे.जे. रुग्णालयाचे पुढील दोन वर्षात होणार नुतनीकरण

J.J. Hospital : जे.जे. रुग्णालयाचे पुढील दोन वर्षात होणार नुतनीकरण

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन

मुंबई : जे. जे. रुग्णालयामध्ये (J.J. Hospital) रुग्णांना अद्ययावत सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी विविध विभागांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. जे. जे. रुग्णालयातील हे नूतनीकरणाचे काम पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण होऊन रुग्णांना अद्ययावत आरोग्य सेवा मिळतील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. जे. जे. रुग्णालयामध्ये शुक्रवारी सकाळी विविध कामांचे उद्घाटन व भूमीपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जे. जे. रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांना अद्ययावत व आधुनिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी मागील काही दिवसांपासून विविध विभागांचे टप्प्याटप्याने नूतनीकरण करण्यात येत आहे. या सर्व नूतनीकरण व अद्ययावती करणामुळे जे.जे. रुग्णालात येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांना सर्व सोयी – सुविधांसहित आधुनिक उपचार मिळतील. सध्या सुरू असलेले हे काम पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी हसन मुश्रीफ यांच्या हस्ते एक हजार खाटांसाठी नवीन केंद्रीय वैद्यकीय गॅसवाहिनी बसविणे, मज्जातंतूशास्त्र व कान, नाक व घसा तसेच बालरोग शल्यचिकित्सा विभागाच्या शस्त्रक्रियागृहाचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण, ६० खाटांसह मुख्य रुग्णालय आयसीयू, सीसीयू व एमआयसीयू विभागाचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण, रुग्णालय आवारातील ऐतिहासिक दिनशॉ मानिकजी पेटीट इमारतीच्या संवर्धनाचे काम, नवीन परिचारिका वसतिगृह, आर. एम. भट्ट व अपना मुलांचे वसतिगृह इमारतीचे दुरस्ती व नूतनीकरण, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र विभाग इमारतीचे अद्यावतीकरण व नूतनीकरण, बीएमएस आणि आरएमओ सेवा निवासस्थानांच्या इमारतींचे मजबुतीकरण व नूतनीकरण आदी कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

त्याचप्रमाणे शरीरक्रियाशास्त्र, व्याख्यानगृह संवर्धनाचे काम, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे नूतनीकरणाचे काम, रुग्ण कक्ष क्रमांक १५ नाक, कान, घसा विभागाचे अद्ययावतीकरण, रुग्ण कक्ष क्रमांक ८ चे अद्ययावतीकरण, रुग्ण कक्ष क्रमांक ४१ बालरोगशल्यचिकित्सा कक्षाचे अद्ययावतीकरण ही कामे पूर्ण झाली असून कामे पूर्ण झालेले विभाग, कक्ष आदींचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.

तसेच जे. जे. रुग्णालयांमध्ये नुकत्याच झालेल्या पाचव्या अवयव दानाबाबत डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे कौतुक करून मुश्रीफ यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, उपअधिष्ठाता डॉ. गजानन चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >