सिंधुदुर्ग : प्रतिकूल हवामान आणि झाडांवर बुरशी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणातील स्थानिक बाजारपेठेत नारळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एका मोठ्या नारळाची किंमत ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
कोकणात स्वयंपाकासाठी तसेच देव आणि धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नारळाचा वापर होतो. शिवाय कोकणात किनारपट्टी भागातली जमीन आणि खारी हवा नारळ लागवडीसाठी पोषक आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नारळाची लागवड आहे. मात्र सध्या प्रतिकूल वातावरण आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या सहा महिन्यात नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे.
Auto Expo 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑटो एक्सपो २०२५ चे उद्घाटन
हवामानात सातत्यान होणारे बदल, अवकाळी पाऊस अशा निसर्गाच्या लहरी परिस्थितीमुळे नारळाच्या झाडांवर बुरशीजन्य तसच कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोळी रोग, शिवाय खोड कीड आणि भुंगा अशा किड रोगांचा प्रादुर्भाव नारळ झाडांवर झाल्याच दिसून येत. या रोगामुळे मोठ्या प्रमाणात होणारी फळ गळती, फळांचा आकार लहान होणे, फळ कुजून जाणं नारळाला फुलोरा न येणे असे परिणाम दिसून येतात सहाजिकच स्थानिक नारळाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे त्यामुळे नारळाचे दर मात्र गगनाला भिडले आहेत.
कोकणातल्या बाजारपेठांमध्ये स्थानिक नारळांबरोबरच कर्नाटक आणि केरळ या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नारळ आयात केला जातो. मात्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या किनाऱ्याकडच्या राज्यात सुद्धा नारळ उत्पादनाची अशीच परिस्थिती असल्याचे नारळ व्यावसायिकांनी सांगितले. एकंदरीतच देशभरातच नारळ उत्पादन कमी झाले आहे, त्याचा सुद्धा परिणाम नारळाच्या किमती वाढीत झाला आहे.