पुणे : पुण्यात अपघातांची मालिका (Pune Accident) सुरुच असल्याचे दिसून येत आहे. काल पुणे शहरात कंटेनरने वाहनांना धडक दिल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. पुणे – नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Local Megablock : २५-२६ जानेवारीला ‘या’ मार्गावरुन लोकल प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी!
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायणगाव परिसरात मुक्ताई ढाब्यानजीक आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी नाशिकहून पुण्याच्या मार्गाने जाणाऱ्या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाला. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक मॅक्झिमो गाडी येत होती. त्याच्या पाठीमागून एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. भरधाव आयशरने प्रवासी असलेल्या मॅक्झिमो गाडीला भीषण धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमो गाडी बंद पडलेल्या एसटीवर जोरात जाऊन आदळली आणि भीषण अपघात घडला.
दरम्यान, या मॅक्झिमो गाडीमध्ये जवळपास १३ प्रवासी होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. (Pune Accident)