

रशिया - युक्रेन युद्धात भारतीयाचा मृत्यू
नवी दिल्ली : रशिया - युक्रेन युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि एक भारतीय गंभीर जखमी झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ३२ वर्षांचा बिनिल टी बी रशिया ...
रशिया - युक्रेन युद्धात ३२ वर्षांच्या बिनिल टी बी याचा मृत्यू झाला तर त्याचा नातलग असलेला जैन टी के गंभीर जखमी आहे. या संदर्भातले वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले. या वृत्ताची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेतली आहे. रशियाच्या सैन्यातील मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना त्यासाठीची परवानगी द्यावी, अशी मागणी भारत सरकारने केली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या १२६ भारतीयांपैकी ९६ मायदेशी परतले आहेत. सध्या १८ भारतीय रशियाच्या सैन्यात आहेत. या व्यतिरिक्त रशियाच्या सैन्यात असलेले पण सध्या बेपत्ता असलेले असे १६ भारतीय आहेत. या भारतीयांचा शोध घ्यावा अशी मागणी भारताने रशियाकडे केली आहे.
बिनिल टी बी याच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जैन टी के याच्यावर मॉस्कोतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. तब्येत सुधारल्यावर जैन टी के मायदेशी परतेल, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.