नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि एक भारतीय गंभीर जखमी झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ३२ वर्षांचा बिनिल टी बी रशिया – युक्रेन युद्धात ठार झाला. बिनिलचा नातलग असलेला जैन टी के हा युद्धात गंभीर जखमी झाला. सध्या जैन टी के याच्यावर उपचार सुरू आहेत. बिनिल टी बी आणि जैन टी के हे दोघेही मूळचे केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील वडक्कनचेरीचे रहिवासी आहेत. झटपट भरपूर पैसे कमावण्यासाठी त्यांनी रशियाच्या लष्करात सहाय्यक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली होती. नोकरीमुळेच ते युद्ध क्षेत्रात वावरत होते.
रशिया सरकारने बिनिल टी बी याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतातील त्याच्या कुटुंबाला कळवली आहे. तसेच जैन टी के हा गंभीर जखमी असल्याचे रशिया सरकारने त्याच्या भारतातील कुटुंबाला कळवले आहे. मॉस्कोतील भारतीय दूतावासाने फोन करुन बिनिलच्या मृत्यूची बातमी त्याची पत्नी जॉयसी हिला कळवली. पण भारत सरकारने अधिकृतरित्या अद्याप बिनिलच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबाला कळवलेली नाही.
रशिया – युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यावर झटपट भरपूर पैसे कमावण्यासाठी केरळमधील अनेक तरुणांनी रशियाच्या सैन्यात वेगवगेळ्या पदांसाठी अर्ज केला होता. यापैकी अनेकजण सध्या युद्ध क्षेत्रात कार्यरत आहेत. या तरुणांबाबतची ठोस आकडेवारी केरळ सरकारने संकलित स्वरुपात जाहीर केलेली नाही. यामुळे नेमके किती तरुण केरळमधून रशियात गेले आहेत आणि तिथून परत येण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या किती मोठी आहे हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत.
बिनिल इलेक्ट्रिशिअन होता, त्याच्यासारख्याच असलेल्या केरळमधील अनेकांनी प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, वायरमन, कुक, ड्रायव्हर अशा प्रकारच्या लष्करी सहाय्यकाच्या जबाबदाऱ्यांसाठी अर्ज केला होता. सुरुवातीला पैशांसाठी गेलेली ही मंडळी युद्ध लांबू लागल्यामुळे आणि दक्षिण भारताच्या तुलनेत प्रतिकूल असलेल्या वातावरणात दीर्घ काळ राहिल्यामुळे मायदेशी परतण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आहे. मुळात लष्करी सेवेत नसल्यामुळे केरळमधून रशियात लष्करी सहाय्यक म्हणून गेलेल्या तरुणांसाठी त्यांची परदेशातली नोकरी ही अवघड जागेचे दुखणे झाली आहे.