मुंबई : प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना असून या शब्दात व्यक्त करणं अनेकांना अवघड जातं. प्रत्येकजण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमात पडतोच. प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. तसेच प्रेमात पडल्यानंतर जमलेल्या सर्व आठवणी ही देखील कधीही न विसरणारी गोष्ट आहे. पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ (Ilu Ilu) या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला.
Ajintha Verul Film Festival : पद्मभूषण सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री अशा ‘फुल ऑन’ अंदाजात हा सोहळा रंगला. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमाची लव्हेबल गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटात पहाता येणार आहे. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा फ्रेश चित्रपट प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची नक्की आठवण करून देईल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘इलू इलू’ च्या निमित्ताने वेगळी भूमिका आणि मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद एली आवराम हिने यावेळी बोलून दाखविला.
बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम हिने ‘इलू इलू’ चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. एली सोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात,अंकिता लांडे, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.