Saturday, February 8, 2025

समतेचा उदय

श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे

शिष्याच्या पात्रतेनुसार गुरुप्रसाद मिळतो. शिष्याचा प्रश्न स्वार्थाचा आहे की परमार्थाचा, हे सद्गुरू जाणतो. प्रश्नावरून शिष्याचा अभ्यास गुरू जाणतो, तसं तो ज्ञानदान करतो…

शिष्याची योग्यता नसेल तर गुरू त्याला विश्वव्यापक ज्ञान देत नाही. माता आपल्या बाळाला त्याचं वय बघून घास भरवते, तशीच गुरुमाऊली करते. जगत्कल्याण करणारा प्रश्न ऐकून गुरू प्रसन्न होतो. त्याला धन्यता वाटते. तो शिष्याचं कौतुक करतो. परस्पर आदर आणि स्तुती केल्यानं ज्ञानाचं देणं-घेणं सहज होतं. वातावरण आनंदी राहतं. हे केवळ अध्यात्मविद्येतच नाही तर सर्वत्र सर्वकाळ दैनंदिन जीवनात हवं. व्यवहार खुलण्यासाठी आणि प्रापंचिक संबंधस्नेह टिकण्यासाठी ‌‘हास्य’ महत्त्वाचं! रागरुसवा, ताणतणाव, मतभिन्नता, किल्मीष, पूर्वग्रहदूषित वातावरण असेल तर अपमान होतो. अपयश मिळतं अन् उपेक्षेनं मनं काळवंडतात. इतरांसाठी झटताना शिष्याला गुरुमहती गाताना संवादसुखाचा लाभ व्हावा.

दुर्लभं त्रिषु लोकेषु
तच्छृणुण्व वदाम्यहम्‌‍|
गुरू विना ब्रह्म नान्यत्‌‍
सत्यं सत्यं वरानने ॥
हे लावण्यवती पार्वती, तिन्ही लोकात दुर्लभ असं गुरुतत्त्व मी सांगतो, ते ऐक.
श्रीगुरू हा नित्यब्रह्मस्वरूप असतो. त्याच्यासारखं परब्रह्म दुसरं नाहीये. हे सत्य मी पुन्हा सांगतोय.

मनातला भाव मुखावर उमटतो. त्यावरून गुरू शिष्याचा विकास किती झालाय हे उमजतो. त्याची पुढील वाटचाल सुरस अन् सुकर व्हावी म्हणून मार्गदर्शन करतो. गुरुसेवा हेच भक्तीचं सौंदर्य. देवी पार्वती स्वत: वेदज्ञान संपन्न असूनही पतीला गुरू मानते, पूजते. शंकरही तिचा अधिकार पुरेपूर मानतात. त्यांनी एका ग्रंथात म्हटलंय, ‌‘ती माझी शक्ती आहे. ती आहे म्हणून मी बलवान आहे. तिच्यावर माझं प्रेम आहे, पण नियंत्रण नाहीये. ती स्वयंभू आहे. एक आदर्श योगिनी आहे.’ खरं तर ईश्वर निनावी आहे. निराकार आहे. भगवंत, भगवान, श्री या आपण दिलेल्या पदव्या आहेत. भग म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्यवान तो भगवान. यश, औदार्य, वैराग्य, ज्ञान, औदार्य अन्‌‍सौंदर्य हे जिथं एकत्र नांदतात ते पवित्र, जागृत देवस्थान म्हणजे श्रीगुरू! श्री म्हणजे वैभव आणि दुसरा अर्थ वाणीवैभव. श्रीगुरू या संज्ञेस पात्र असणारा युगपुरुष असतो. व्यष्टी आणि समष्टीसाठी सतत कार्यरत असणारा गुरू विश्वात्मक देवच असतो. तो आणखी कसा असतो? शुद्ध आचारविचारांचा, उदार, प्रसिद्धी टाळणारा, अखंड आनंदाचा सागर असतो. तो कुंडलिनी जागृत करतो. शक्तिपातकुशल असून त्याचं वर्णन करणं अशक्य असतं. अहंकार हे सर्व आपत्तींचं मूळ कारण असून त्याच्या जोडीला निंदा असेल तर कोणताही अनर्थ घडू शकतो. ‌‘स्तुती’ हा एक सुखद भावनेचा प्रकार अंगी बाणवला तर सुखसंपत्तीचा लाभ होतो. परमेश्वराला स्तुती आवडते, तर माणसाला का नाही आवडणार? गुरुस्तुतीनं अनिष्ट निवृत्ती होते. इष्ट प्राप्ती होते. गुरुभजन, कीर्तन, प्रवचन, नर्तन किंवा गुरुचिंतन, मनन, गायन फार उपकारक आणि पोषक ठरते. परतत्वाचा स्पर्श झाल्यावर आपली रसिकता वाढते. आश्वासक वृत्ती टिकते आणि चिकित्सक दृष्टी मावळते. यापेक्षाही महत्त्वपूर्ण लाभ होतात. एकदा का गुरुभाव दृढ झाला की, गुरुकृपेचा वर्षाव अखंडपणे होत राहतो.

आताच कुंडलिनीचा विषय निघालाय. त्याबद्दल संक्षिप्त कल्पना देणं आवश्यक आहे. कुंडल म्हणजे वेटोळे घालून बसलेली साडेतीन हात लांबीची दिव्य शक्ती. प्रत्येक व्यक्तीत मुलाधारात पाठीच्या कण्याच्या खाली असते. तिला दोन मुखे असतात. एक बाह्यजगतात. इंद्रियसुखात ते प्रवृत्त करतं. दुसरं अंतराकडे वळलेलं असतं. निवृत्तमार्गानं अवघं शरीर व्याप्त करण्यासाठी, मस्तकापर्यंत पोहोचण्यासाठी, उर्ध्वगमन करते. या सर्व यौगिक क्रिया गुरुसाहाय्यानं करतात. गुरुमंत्रानं शिष्य आसक्ती सोडून निवृत्तीचा नाश होतो. ज्ञानमार्ग पसंत करतो. भक्तीच्या एकेक सोपान मार्गक्रमणावर राहतो आणि मुक्तानंद मिळवतो! आत्मसाक्षात्काराचा धनी होतो. पिंडातून मुक्त झाल्याचा पुरावा म्हणजे कुंडलिनीजागृती. मानवाला देवत्व देणारे हे आत्मबळ प्रत्येकात असतं. साधक सिद्धवचनांवर विश्वास ठेवून साधना करतो, तेव्हा संपूर्ण शरणागतीची आत्मानुभूती किती श्रेष्ठ आहे हा आत्मप्रत्यय येतो. मोठ्या भक्तिभावानं हृदयाच्या गाभाऱ्यात श्रीगुरूमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. गुरुशक्ती नाभीत आहे अशी कल्पना करून नाभीला स्पर्श करावा. हीच शक्ती विश्वशक्तीतही आहे, हे मनोमन मानावं. काया-वाचा-मनानं गुरुचरण घट्ट धरावेत. नाभीस्पर्शानंतर स्वत:च्याच पायांना स्पर्श करावा.

गुरू कसा असावा?

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांसाठी, लौकिक सुखांसाठी आणि पारलौकिक शांति-समाधानासाठी गुरुमंत्रजप करतात. अशी तयारी झाल्यावर नामबीजातील शक्ती साधकात येते. नामस्मरणानं ध्यानयोग साधला जातो.
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी |
तैसी जयाची बुद्धी चराचरी |
होय साम्याची उजरी |
निरंतर ॥ (६.९७)
समतेचा उदय होतो. जातिधर्माची विषमता नष्ट होते. अंतरातील आत्माराम बाह्यजगतात गुरूरूपानं वावरतो. गुरूची अनुकूलता लाभते अन्‌‍ संकटांचा पाडाव होतो. दुर्दैवाचे दशावतार संपतात. अडथळे दूर होतात. गुरुकृपेनं मुक्तीचं महाद्वार उघडतं. गुरूची तुलना करता येत नाही. त्याच्यासारखा तोच!

रम्य अशा कैलास शिखरावर, भक्तिसाधना सांगणारे सुकुशल भगवान शिवाला भक्तिपूर्वक प्रणाम करून प्रश्न केला, तो कोणता? पुराण सांगणारे सूतमुनी हे शौनकादी ऋषींना गुरुमहिमा सांगत होते, शंकर-पार्वती यांच्या प्रश्नोत्तरांतून गुरूची गरज आपण जाणून घ्यायला हवी. शंभू महादेव म्हणतात, “हे उमे, वेदशास्त्र, पुराणं, इतिहास वगैरे मंत्रयंत्रादि विद्या, स्मृति-श्रुती काय अन्‌‍ व्रत, तप, साधना कितीही घडली तरी संसारबंधनापासून मुक्तता होत नाही. सारे विद्वान धर्मचर्चा करतात. शब्दांचा कीस काढतात. शास्त्रग्रंथ आणि स्तोत्रं पाठ करतात; परंतु सत्यदर्शन होत नाही. अशा अनुभवशून्य, साधनेला साध्य समजणाऱ्या महापंडितांच्या शब्दजालात अडकू नये!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -