Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनाम निष्ठेने घ्यावे

नाम निष्ठेने घ्यावे

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय? तर आपल्या गुरूने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने, सांगितले म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची, पण तितकीच दुर्मीळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे. शंका अनेक तऱ्हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टी कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे? खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या शंकेला वावच कोठे राहिला? समजा, दोन माणसे जेवायला बसली. त्यातल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवत होता. दोघेही जेवून उठले. यात उपाशी कोण राहिला? दोघांचीही पोटं भरलीच ! तसे, नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल?

नाम व विकल्प!

समजा, आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलविले; तो आला आणि त्याने सांगितले की, ‘तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी’, तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे, भगवंताने सांगितले आहे की, ‘जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम’, तर मग या वचनावर विश्वास ठेऊन नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे, असे का करता येऊ नये? हीच श्रद्धा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याच्याच नावाने जगावे; म्हणजे माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून, त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही, या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो, त्याचे महत्त्व भगवंत स्वत:पेक्षाही जास्त वाढवतो.

तात्पर्य : नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच ‘निष्ठेचे नाम’ असे म्हणतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -