Wednesday, March 19, 2025

नाम व विकल्प!

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

नाम घेऊ लागले की विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी होते, याला काय करावे? अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करतो; पण असे होण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित होते हे आपल्या लक्षात येत नाही. मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही, अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात. विकल्प हे अति सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला, त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम.

पुण्यप्राप्ती

एखाद्या बिळात सर्प शिरला, तर त्याला बाहेर काढण्याकरिता त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला तिथे राहणे असह्य करील असाच उपाय करणे जरूर असते. बाहेरून कितीही आरडाओरडा केला तरी त्याचा उपयोग होत नाही. बिळात धूर किंवा गरम पाणी सोडले की तो बाहेर येतो. त्याप्रमाणे, नाम घेतले की विकल्प उठतात, म्हणजे विकल्पांच्या मूळ ठिकाणापर्यंत नामाची आच जाऊन पोचली असे ठरते. तर मग नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून, विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्यय करावा, हाच त्याला उपाय. नामाबद्दल सुुरुवातीला सर्वांचीच वृत्ती साशंक असते, पण आपण सतत नाम घेत गेल्यानेच विकल्प कमी होतात. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले.

आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले चालणे चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये. पण गंमत अशी होते की, वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असे म्हटले तरी, तो मुद्दाम खाकरतो आणि आपले लक्ष वेधतो. अशा वेळी त्याच्याकडे पाहूनही आपण दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे पण आपले नाम सोडू नये. शंका घ्यायचीच झाली तर नाम चालू ठेवून घ्या, म्हणजे ते नामच शंकांचे निरसन करील आणि विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालील.

तात्पर्य : पुष्कळ केलेले शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरविले की आपली वृत्ती निःशंक होतेच होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -