मुंबई : चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. सैफवर लिलावती रुग्णालयात दोन यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याच्या कंबरेजवळच्या मणक्यातील भागातून सुमारे अडीच इंचाचा चाकुचा भाग बाहेर काढण्यात आला आहे. सध्या सैफ अली खान विश्रांती घेत आहे. डॉक्टरांच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आणखी काही दिवस सैफला रुग्णालयात उपचार घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
घरात घुसखोरी, नोकराणीशी वाद नंतर चाकूने हल्ला, पाहा काय घडले नेमके…
अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी १६ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा मोठ्या जखमा झाल्या. यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम याने रुग्णालयात दाखल केले. सैफवर पहाटे पाचच्या सुमारास आणि सकाळी नऊच्या सुमारास अशा दोन शस्त्रक्रिया झाल्या. लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वात सैफवर उपचार सुरू आहेत. चाकूने झालेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी डाव्या हातावर आणि मानेवर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. डॉक्टर निना जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेवेळी सैफवर लक्ष ठेवण्यासाठी कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास गोडबोले उपस्थित होते.
Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, अभिनेत्याला रुग्णालयात केलं दाखल
हाती आलेल्या माहितीनुसार सैफवर चाकू हल्ला करणारी व्यक्ती अद्याप फरार आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. सैफच्या घरातील चार नोकरांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात एक महिला नोकर आहे. या महिला नोकराशी चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा मध्यरात्री सैफच्या घरातील एका खोलीत वाद सुरू होता. या वादाचा आवाज ऐकून सैफ खोलीत आला. त्यावेळी संबंधित व्यक्तीने सैफवर चाकू हल्ला केला आणि घरातून पलायन केले. चाकू हल्ला करणाऱ्याने महिला नोकराच्या हातावर वार केला. तसेच अभिनेता सैफ अली खान याच्यावर सहा वार केले. यामुळे सैफच्या शरीरावर सहा मोठ्या जखमा झाल्या. यापैकी दोन जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. महिला नौकरही चाकू हल्ल्यात जखमी झाली पण तिच्या जखमांचे स्वरुप जास्त गंभीर नव्हते. तातडीने उपचार केल्यामुळे महिला नोकराची तब्येतही स्थिर आहे. पोलिसांनी या महिला नोकराची सखोल चौकशी केली. चाकू हल्ला करणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सैफ ज्या इमारतीत वास्तव्याला होता त्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. या फूटेजमध्ये थोड्या वेळासाठी चाकू हल्ला करणाऱ्याचा चेहरा दिसला आहे. पोलीस नोकरांकडून मिळालेली माहिती आणि फूटेजमध्ये दिसलेला चेहरा याच्या मदतीने हल्लेखोराला शोधत आहेत.
दया नायक अॅक्शन मोडमध्ये
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे चकमक फेम अधिकारी दया नायक तपासकामात सहभागी झाले आहेत. पोलिसांनी सैफवर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी काही पथके तयार करुन त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.