केईएम रूग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी प्रारंभ

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत मनपा क्षेत्रातील पहिल्या 'नॅश क्लिनिक'चा होणार शुभारंभ


मुंबई: देशातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित 'सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम हॉस्पिटल)’ चे अग्रगण्य स्थान आहे. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, १८ ते बुधवार, २२ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षात नियोजित कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. केईएम रूग्णालय कर्मचारी भवन या २१ मजली इमारतीचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्यात होणार आहे.


'सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम हॉस्पिटल)’ ने आपल्या शतकभराच्या वाटचालीत संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. या रुग्णालयात मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातून रुग्ण येतात. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलेले विद्यार्थी जगभर पसरले आहेत. अशा या अग्रगण्य संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त साजेसे असे उपक्रम तसेच शतकपूर्ती महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यास अनुसरुन तसेच रूग्णसेवेला प्राधान्य देतानाच जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत नियमितपणे अभ्यासपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी देखील दिल्या आहेत.


या सर्व पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या वतीने दिनांक १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित शतकपूर्ती महोत्सव तसेच एकूणच वर्षभरात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत यांनी प्रसारमाध्यमांशी आज (१५ जानेवारी) संवाद साधला.


केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त १८ ते २२ जानेवारी या पाच दिवस कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमांपैकी पहिला दिवस माजी विद्यार्थ्यांसाठी, दुसरा दिवस निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांसाठी आणि तिसरा दिवस परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गासाठी असेल. तसेच, चौथा दिवस हा कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक वर्गासाठी राहणार आहे. पाचव्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा हे कर्मचारी, विद्यार्थी, अध्यापक वर्ग आणि डॉक्टर यांना संबोधित करणार आहेत. यादिवशी सर्वोत्तम निवासी डॉक्टर, सर्वोत्तम वॉर्ड तसेच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहेत. तर, कर्मचारी वर्गासाठी मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. संगीता रावत यांनी दिली.


केईएम रुग्णालयतील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सुविधेसाठी एकूण २१ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये १२० खोल्या कर्मचारी वर्गासाठी आणि ६३ खोल्या डॉक्टरांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अस्थिव्यंग उपचार विभागाच्या आवारातील जागेत ही इमारत उभारण्याचे नियोजित आहे. शतकपूर्ती महोत्सव शुभारंभ सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.


तसेच, शतक महोत्सवी कार्यक्रमांमध्ये ख्यातनाम अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांना सन्माननीय अतिथी म्हणून सोमवार, दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी निमंत्रित करण्यात आले आहे. श्री. अमिताभ बच्चन हे प्रामुख्याने नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत (ब्रॅण्ड एम्बेसेडर) म्हणून कार्यरत असणार आहेत. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस या आजारामध्ये फॅटी लिव्हरमुळे रूग्णाला सोरायसिस होऊ शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे तरूणाईत वाढणाऱ्या या आजारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या बाह्य रूग्ण विभागाची सुरूवात केईएम रूग्णालयात करण्यात येणार आहे.


नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (नॅश - NASH) हा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) चा एक प्रकार आहे. यकृताच्या या आजाराचे निदान करुन उपचार घेणे गरजेचे आहे. याकरिता सदर आजारांवरील उपचारासाठी केईएम रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओपीडी स्थापन केली जाणार आहे. या ओपीडीमध्ये दर शुक्रवारी रुग्णांना तपासणी आणि उपचार सेवा मिळणार आहे. NASH च्या उपचारासाठी ही ओपीडी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. यामुळे या आजाराबाबत जागरूकता वाढवणे आणि योग्य उपचार मिळवणे सोपे होणार आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट विभागाचे डॉ. जयंत बर्वे आणि डॉ. आकाश शुक्ला यांच्या चमूच्या माध्यमातून या ओपीडीची सुरूवात होणार आहे.


महोत्सवाच्या निमित्ताने रूग्णालयाची वाटचाल, गौरवशाली इतिहास, वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीचा आढावा आणि उद्दिष्टपूर्तीचा मागोवा घेण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. माजी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग आणि संपूर्ण केईएम रूग्णालय परिवाराची या विविध कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती असणार आहे.


जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या वर्षभराच्या कालावधीत प्रत्येक आठवड्यात शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रूग्णालयाच्या गौरवशाली इतिहासाचा लघूपट तयार करण्यात आला आहे. तसेच रूग्णांच्या शिक्षणासाठी १०० लघूपट निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक बाह्य रूग्ण विभागाच्या ठिकाणी हे लघूपट प्रदर्शित करण्यात येतील, असेही अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने