बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा राखीव रक्षक (District Reserve Guard), केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकाची पाचवी बटालियन (Commando Battalion for Resolute Action) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची २२९ वी बटालियन (Central Reserve Police Force) यांनी संयुक्त कारवाई केली.
सुरक्षा पथकांच्या मोहिमेत जानेवारी महिन्यात आतापर्यंत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. याआधी १२ जानेवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चकमक झाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण पाच नक्षलवादी ठार झाले होते. मागच्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा पथकांना मिळू लागलेल्या यशामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.