प्रयागराज, भारतातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या दुर्मीळ अशा महाकुंभ मेळ्याची सुरुवात यंदा प्रयागराजमध्ये झाली आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या ४५ दिवसांच्या कालावधीत महाकुंभ मेळा हा हिंदूंचा धार्मिक उत्सव साजरा होत आहे; परंतु या वर्षीचा कुंभमेळा हा निव्वळ कुंभमेळा नसून तो महाकुंभमेळा आहे. १४४ वर्षांतून एकदा येणारा हा एक दुर्मीळ क्षण मानला जातो. दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा असे या कुंभमेळ्याचे वर्णन सध्या केले जाते आहे. दर बारा वर्षांनी हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. यंदाच्या प्रयागराज कुंभमेळ्यात ४५ कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने, त्याची दखल जगभरातील प्रमुख्य देशातील माध्यमांनी घेतली आहे.
महाकुंभ मेळ्यात गेल्या दोन दिवसांत लाखोंच्या संख्येने भाविक याठिकाणी दाखल झाले आहेत. विदेशी भाविकांनाही याची भुरळ पडली असून हा आध्यात्मिक मेळावा ते अनुभवत आहेत. पवित्र स्नान आणि आध्यात्मिक अनुभूतीमुळे विदेशी नागरिक महाकुंभ मेळ्यासह भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून अनेक महिला यात्रेकरू आल्या आहेत. “या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने स्वतःला मी खूप भाग्यवान समजते. भक्ती योग आणि सनातन धर्माविषयीचे ज्ञान घेऊन आम्ही येथे आलो आहोत. आता गंगेत स्नान करण्यासाठी, सर्वांसोबत आध्यात्मिक साधना करण्यासाठी उत्सुक आहे”, अशी प्रतिक्रिया पेरू देशातील एका यात्रेकरूने वृत्तसंस्थेला दिली आहे. “भारताचा आत्मा या क्षणी खूप शक्तिशाली आहे. गुरू आणि शनी एका रेषेत आहेत. महाकुंभ हा केवळ भारतासाठी नाही, तर महाकुंभ सर्व जगासाठी आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतून आलेल्या एका भाविकांने व्यक्त केली. अमेरिकेतील प्रमुख माध्यम समूहांपैकी सीएनएन वृत्तसंस्थेने ‘प्रयागराजमधील महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे. महाकुंभमेळास येणाऱ्या भाविकांची संख्या अचंबित करणारी आहे. महाकुंभमेळ्यात सेलिब्रिटी आणि परदेशी पर्यटक एकत्र येतात’, असे वर्णन केले आहे, तर ब्रिटिश माध्यम समूहाचा भाग असलेल्या बीबीसीने या महाकुंभमेळ्याबाबत मानवतेचा सर्वात मोठा मेळावा असल्याचे वृत्तांकन करताना वर्णन केले आहे. वृत्तवाहिनीने प्रयागराजमध्ये विविध देशांतील भाविकांशीही संवाद साधला. अर्जेंटिनातून आलेल्या व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितले की, “प्रत्यक्ष भक्ती काय असते, हे अनुभवण्यासाठी महाकुंभमेळात सहभागी झालो आहे. गंगा नदीने मला बोलावले, म्हणून मी इथे आलो आहे.”
अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३४ कोटी आहे. त्यापेक्षा जास्त लोक म्हणजे अंदाजे ४५ कोटी उत्तर प्रदेश राज्यात पुढील ४५ दिवसांमध्ये या महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचणार आहेत. सौदी अरेबियातील मुस्लिमांसाठी पवित्र स्थळे असलेल्या मक्का आणि मदीना येथे दरवर्षी हजसाठी जाणाऱ्या २० लाख लोकांपेक्षा कुंभमेळ्यातील संख्या जास्त आहे. त्यामुळे ही संख्या २०० पट अधिक मानायला हरकत नाही. त्यामुळेच हा कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारची एक मोठी परीक्षा असणार आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सरकारकडून या कुंभमेळ्याची चोख व्यवस्था व्हावी याची दक्षता घेतली गेली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून महाकुंभासाठी पायाभूत सुविधांपासून स्वच्छतेपर्यंतचे ६ हजार ९०० कोटी रुपयांचे ५४९ प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे भाविकांना योग्य माहिती मिळावी यासाठी महाकुंभ-२०२५ च्या लोगोचे अनावरण करून वेबसाइट आणि ॲॅपदेखील लॉन्च केले. तसेच हे संकेतस्थळ भाविक आणि पर्यटकांसाठी हवाई, रेल्वे आणि रस्त्याने महाकुंभला पोहोचण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ठरत आहेत. याद्वारे प्रयागराजमधील राहण्याची व्यवस्था, स्थानिक वाहतूक, पार्किंग, घाटांवर जाण्याचे दिशानिर्देश इत्यादींची माहिती उपलब्ध आहे. तसेच स्थानिक आणि जवळपासची आकर्षणे आणि पर्यटन स्थळांचे मार्गदर्शनही यात आहे.
तसेच या महाकुंभमुळे उत्तर प्रदेश सरकारच्या महसुलात २५ हजार कोटी रुपयांची भर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक स्व-मदत गट, कारागीर, हॉटेलवाले, होमस्टे मालक, रेस्टॉरंट ऑपरेटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फायदा होणार आहे. पहिल्यांदाच कोणत्याही घटनेत इतक्या मोठ्या प्रमाणात चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि बायोमेट्रिक ओळख याठिकाणी वापरण्यात येत आहे, ज्यामुळे लोकांची सुरक्षितता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे आणि एखादी व्यक्ती हरवल्यास त्यांना शोधणे सोपे होणार आहे. कार्यक्रमादरम्यान लोक स्वच्छ आणि शुद्ध पाण्यात स्नान करतील याची खात्री करण्यासाठी गंगा नदीजवळ पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे. याशिवाय, १०० खाटांचे एक प्राथमिक रुग्णालय आणि २० खाटांचे दोन रुग्णालये या परिसरात उभारण्यात आली आहेत. श्रद्धेचा भाग म्हणून लाखो हिंदू धर्मिय मोक्ष प्राप्तीची कामना करण्यासाठी आणि पापाचा नाश करण्यासाठी कुंभमेळ्यात डुबकी मारून स्नान करत असले तरी, जगभरातील माध्यमे आता महाकुंभ मेळ्याकडे मोठा इव्हेंट म्हणून पाहत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार दर बारा वर्षांनी होत असलेल्या कुंभमेळ्याची चर्चा पूर्वी भारतीयांपुरती असायची. आता विदेशातील अनेक देशांना महाकुंभ मेळ्यातील परंपरा, कथा जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे.