नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारतासाठी आणि भारतीय नौदलासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची स्थापना केली आणि त्याला बळकट केले आहे. २१ व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. भारतीय बनावटीच्या युद्धनौका नौदलात सामील होत आहेत, याच्या निर्मितीत असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारताचा समृद्ध इतिहास राहिला आहे, भारत आता एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे. आज ताफ्यात आलेल्या युद्धनौकांमध्ये या सामर्थ्याची झलक दिसत असून युद्धनौकांमुळे शिवाजी महाराजांच्या भूमीवरून नौदलाला अधिक सामर्थ्यवान केले गेले असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये मोदी यांनी ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. तिन्ही जहाजांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन झाल्यावर त्यांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा दिवस भारताचा सागरी वारसा नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी खूप मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवे सामर्थ्य आणि दूरदृष्टी दिली. आज या पवित्र भूमीवर आपण २१ व्या शतकातील नौदलाला भक्कम करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. एकाच वेळी एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि पाणबुडी यांचे अनावरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिन्हीही युद्धनौका मेड इन इंडिया आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. २१ व्या शतकातील भारताचे सैन्य सामर्थ्य अधिक सक्षम आणि आधुनिक असणे हे देशाच्या प्राधान्यांपैकी एक आहे. पाणी, जमीन, आकाश असो, खोल समुद्र असो अथवा अनंत अवकाश असो, भारत सर्व ठिकाणी आपल्या हितांचे रक्षण करत आहे. यासाठी सतत सुधारणा केल्या जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
आयएनएस सुरत जगातील सर्वात मोठी युद्धनौका
राष्ट्रार्पण केलेल्या नौदलाच्या तीन प्रमुख युद्धनौकांमुळे सागरी सुरक्षेमध्ये वाढ होईल. ‘आयएनएस सुरत’ हे पी१५बी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पाचे चौथे आणि शेवटचे जहाज आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक हे जहाज आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. आयएनएस निलगिरी, हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे.
पी७५ स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी पाणबुडी
आयएनएस वाघशीर, पी७५ स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौकांमुळे भारतीय नौदल अधिक सुसज्ज होणार आहे.
पी १७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज
आयएनएस नीलगिरी हे पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. हे जहाज भारताच्या नौदल डिझाइन कौशल्याचे प्रतीक आहे. त्यात प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान आणि अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आहे.
युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित
निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून १०० हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री मोदी यांनी काढले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व वाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नौदल प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला.
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर!
भारतीय नौदलाच्या मुंबईतील गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलासाठी आजचा दिवस इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवावा असा आहे. एकाच दिवशी दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात येण्याची पहिलीच वेळ आहे.
भारतीय नौदलातील अधिकारी राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली. निलगिरी फ्रिगेटवर शत्रूशी लढण्यासाठी शस्त्र आणि मिसाईल्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने आठ ब्रह्मोस मिसाईल आहेत. त्या समुद्रावर मारा करतील. निलगिरीवर ३२ बराक मिसाईल असून त्या आकाशातील टारगेटवर मारा करतील. यावर पाणबुडी विरोधी रॉकेट लॉन्चर असून ते पाण्यातून मारा करतील. आयएनएस निलगिरी ५५०० नॉटिकल प्रवास करू शकते, स्पीड २८ नॉटिकल प्रति तास आहे.
नौदलाचे दुसरे अधिकारी प्रताप पवार यांनी आयएनएस निलगिरीसंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले या युद्धनौकेचं वजन ६६७० टन असून लांबी १४९ मीटर आहे. यामध्ये स्टेल्थ डिझाईन अँड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. शत्रूच्या रडार मध्ये टिपली जाऊ नये यासाठी अनेक उपकरण हे समोरील डेक वर न ठेवता आत मध्ये घेण्यात आले आहेत, असे प्रताप पवार यांनी सांगितले.
आयएनएस विशाखापटनम, आयएनएस मोरम्युगाव आणि आयएनएस इंफाळ नंतर प्रोजेक्ट १५ बी ची शेवटची युद्धनौका आयएनएस सूरत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गुजरात राज्याच्या एका शहराचं नाव पहिल्यांदाच युद्धनौकेला देण्यात आलं आहे. आयएनएस सूरत या युद्धनौकेने निर्मितीपासून ते लाँच आणि लाँच ते कमिशनिंग पर्यंत जो कालावधी लागला त्यामध्ये एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी वेळात हा सगळा प्रवास पूर्ण करत ३१ महिन्यात जलावतरण ते कमिशनिंगचा काळ पूर्ण करत ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेची खासियत म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तर केला आहे शिवाय पहिल्यांदाच निर्मिती वेळीच महिलांसाठी राहण्याची वेगळी सुविधा आहे. नौदल अधिकाऱ्यांची आणि सेलरची वाढती संख्या पाहता ही सुविधा करण्यात आली आहे, अशी माहिती आस्था कंबोज आणि अहिल्या अरविंद या महिला नौदल अधिकाऱ्यांनी दिली.
आयएनएस सूरत युद्धनौकेची लांबी १६४ मीटर असून रुंदी १८ मीटर तर वजन ७६०० टन आहे. शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी इथे सुद्धा ब्रह्मोस मिसाइल, बराक मिसाईल, पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स आहेत.
भारतीय नौदलात सायलेंट किलर म्हणून ओळख असलेली आयएनएस वाघशीर पाणबुडी प्रोजेक्ट ७५ च्या स्कॉर्पियन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. २०२२ साली जलावतरण झाल्यानंतर तिच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षानंतर ती भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पाणबुडीची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर आहे. ही खोलवर समुद्रात जाऊ शकते आणि शत्रूशी दोन हात करू शकते. शिवाय 45 ते 50 दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करू शकते, अशी माहिती नौदल अधिकारी निमिष देशपांडे यांनी दिली.
तिन्ही मोठ्या ताकदीच्या युद्धनौका आणि पाणबुडीचं कमिशनिंग होऊन नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याने कमिशनिंगचा हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची मान जागतिक पातळीवर अभिमानाने अधिक उंचावली आहे.