मुंबई : आमदारांनी सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या प्रकृतीकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे, यासाठी योगा किंवा तत्सम व्यायाम करा. मी स्वतः पहाटे उठून दररोज योगा करतो. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करून त्यांच्यासोबत विरोधकांनाही आपलेसे करून घ्या. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस नीलगिरी’ आणि ‘आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. तिन्ही जहाजांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन झाल्यावर त्यांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यात महायुती मजबूत करण्यासोबतच एकमेकांशी समन्वय साधण्याची सूचना केली. त्याशिवाय आमदारांनी मतदारसंघाची काळजी घेतानाच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही केलेल्या कामांवर लोकांची मते काय हे जाणून घेतले पाहिजे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचा उल्लेख आमदारांच्या बैठकीत केला.
युद्धनौकामुळे नौदल बनले सामर्थ्यवान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला विश्वास व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर आले होते त्यांचे उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे आमदारांनी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला मोदींनी दिला. २०११ साली राज ठाकरेंनी गुजरात दौरा केला होता तसेच आमदारांनी अभ्यास दौरे केले पाहिजेत. समाज आणि मतदारसंघासोबतच कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे. कामाचा संकल्प करून त्याचे नियोजन केले पाहिजे असं त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी आमदारांना काय कानमंत्र दिले?
सामाजिक, राजकीय जीवनात काम करताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या, दरवर्षी मेडिकल चाचणी करून घ्या. घरातील कुटुंबाकडे विशेष लक्ष द्या, सामाजिक जीवनात वावरताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा. महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या. गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपलं सगळ्याकडे लक्ष असले पाहिजे. गुजरातमध्ये ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुकीत भाजपाने सत्ता कशी राखली याचे उदाहरण पंतप्रधानांनी बैठकीत दिले. येणाऱ्या काळात महायुती आमदारांनी तसेच काम करावे असा सल्ला मोदींनी दिला.