इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
केंद्रातील सत्तेपासून भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर स्थापन झालेल्या इंडिया नामक आघाडीची (India Aghadi) एक्स्पायरी डेट आता जवळ आली असून आघाडीतील प्रमुख पक्षच विसर्जनाची भाषा बोलू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अब की बार ४०० पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला इंडिया आघाडीने २४० जागांवर रोखले. पण नववर्षात इंडिया आघाडीला आपला गाशा गुंडाळण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला टिकवता आले नाही. विशेषतः सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपा विरोधी आघाडीची महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांत मोठी दुर्दशा झाली. इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसवर आणि काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर आघाडीतील प्रादेशिक पक्षांचा विश्वास राहिलेला नाही आणि काँग्रेस पक्षही आघाडीतील घटक पक्षांना ढुंकून विचारत नाही. दिवसेंदिवस बलाढ्य होत असलेल्या भारतीय जनता पक्षाला कॉंग्रेस स्वबळावर तोंड देऊ शकत नाही आणि भाजपाशी लढण्यासाठी काँग्रेस इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चाही करीत नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीतील व राज्यात महाविकास आघाडीतील मतभेद उफाळून आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हाच भाजपाचा राजकीय शत्रू नंबर १ आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसची झूल नि राहुल गांधींचे नेतृत्व झुगारून देण्याची भाषा बोलत आहेत. इंडिया आघाडीतील असंतोषाचा लाभ भाजपाला मिळतो आहे. म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा भाजपाला शतप्रतिशत यश मिळवून देण्याचा एल्गार पुकारत आहेत. इंडिया आघाडीची अवस्था आयसीयूमध्ये गेल्यासारखी आहे. ही वेळ आघाडीवर आणली कोणी ? लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाला पुन्हा मोठे यश मिळू लागले आहे, त्यामुळे इंडियाचे नेते हबकले आहेत. इंडिया आघाडीवर विसर्जनाची पाळी राहुल गांधी यांच्या वागण्यामुळे आली आहे का, या प्रश्नाने कॉंग्रेसलाही निरूत्तर केले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले की, इंडिया आघाडीचा हेतू लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभव करणे इतकाच मर्यादित होता. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले की, भाजपा विरोधकांमध्ये एकजूट नाही. म्हणून इंडिया आघाडी बरखास्त केली पाहिजे. महाराष्ट्रातील उबाठा सेनेने तर, इंडिया आघाडीची गरज संपली असेल तर काँग्रेसने तसे जाहीर करावे, कोणत्या मार्गाने जायचे ते आम्ही ठरवू. इंडिया आघाडीची निर्मिती कशासाठी झाली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशभर भाजपाचा अश्वमेध चौफेर दौडत आहे, त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्वच धोक्यात आले. भाजपा विरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून इंडिया या बॅनरखाली पक्षांना एकत्र आणून भाजपाला रोखायची रणनिती आखण्यात आली. दि. १८ जुलै २०२३ रोजी बंगळूरु येथे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सपा, आम आदमी पक्ष आदी २६ राजकीय पक्ष एकत्र आले व त्यांनी आघाडी स्थापन केली.
इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया असे आघाडीचे नामकरण करण्यात आले. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडीचे अध्यक्ष करण्यात आले. सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून हटवावयाचे हाच इंडिया आघाडीचा उद्देश होता. बंगळूरुच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे सारे कार्यक्रम, प्रचार मोहीम, प्रसिद्धी सर्व काही इंडिया या बॅनरखाली असेल असे जाहीर केले. पण आघाडी स्थापन झाल्यावर प्रादेशिक पक्षांकडून काही हादरे बसले, तर काही वेळा अपशकूनही झाले. इंडियाच्या स्थापनेनंतर सहा महिन्यांतच म्हणजे २४ जानेवारी २०२४ रोजी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक आपला पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस दुर्बल आहे. काँग्रेसने तृणमूल काँग्रेसकडे १०-१२ जागांची मागणी केली होती, पण ममता यांनी त्याला साफ नकार दिला. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या नाहीत किंवा इंडियाशी त्यांनी कधी फारकत घेतली नाही. पश्चिम बंगालमध्ये मेरी मर्जी अशी त्यांची भूमिका कायमच ताठर राहिली आहे. ममता यांच्या स्वबळावरच्या घोषणेच्या पाठोपाठ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर दि. २७ जानेवारी २०२४ रोजी इंडियाला राम राम केल्याची बातमी झळकली. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट भाजपाप्रणीत एनडीएचा रस्ता धरला. ज्या नेत्याने इंडियाचा पाया रचला तोच भगव्या ब्रिगेडमध्ये निघून गेला.
ममता व नितीश कुमार यांचे मेरी मर्जी राजकारण भाजपाच्या पथ्यावरच पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १२ मे २०२४ रोजी बिहारमध्ये पाटण्यात केलेल्या रोड शोमध्ये बोलताना काँग्रेसला झोडून काढले. ते म्हणाले, केवळ एका परिवाराचे हित जपण्यासाठी व काहीही करून सत्ता काबीज करण्यासाठी विरोधी पक्षांची धडपड चालू आहे पण आम्ही ते साध्य होऊ देणार नाही. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकल्या. सन २०१९च्या निवडणुकीत भाजपाचे ३०३ खासदार निवडून आले. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने ४०० पारची घोषणा दिली होती. पण २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसची घोडदौड २४० वर थांबली, तर काँग्रेसच्या खासदारांच्या संख्येने शंभरी गाठली. काँग्रेसच्या यशात इंडिया आघाडीचा वाटा मोठा होता. सन २०१९ मध्ये लोकसभेतील एनडीएच्या खासदारांची संख्या ३६० होती, २०२४ मध्ये ती २९३ झाली. सन २०१९ मध्ये भाजपाच्या खासदारांची संख्या ३०३ होती, तर २०२४ मध्ये २४० वर थांबली. सन २०१९ मध्ये विरोधी आघाडीच्या खासदारांची संख्या ११९ होती, २०२४ मध्ये २३४ पोहोचली. २०१९ मध्ये काँग्रेसचे लोकसभेत ५२ खासदार होते, २०२४ मध्ये ही संख्या १०० झाली. लोकसभेत २०१४ व २०१९ मध्ये विरोधी पक्ष दुर्बल होता. विरोधी पक्ष नेताही नव्हता. २०२४ मध्ये विरोधी पक्ष मजबूत झाला. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेता आहेत. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाने ५४३ पैकी ४४१ जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले होते. इंडिया आघाडीने ४६६ जागांवर भाजपाशी लढत दिली. आरक्षण, संविधान, महागाई व बेरोजगारी या मुद्द्यावर इंडिया आघाडीने प्रचारात भर दिला. भाजपाला संविधान बदलायचे आहे, म्हणून ४०० पारची घोषणा दिली आहे, असा प्रचार आघाडीने केला व त्याचा अपेक्षित परिणाम मतदानावर झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक झाली. या राज्यात आप आणि सपा दोन्ही पक्षांना निवडणूक लढवायची होती. पण काँग्रेसने त्यांना जागा सोडण्यास नकार दिला. काँग्रेसमधील गटबाजी व इंडियामध्ये फाटाफूट याने काँग्रेसची हरियाणात वाट लागली व भाजपाने पुन्हा सत्ता काबीज केली. महाराष्ट्रात महाआघाडीत सत्ता वाटपात शेवटपर्यंत घोळ चालू राहिला. लोकसभेत यश मिळाले म्हणून आघाडीला फाजिल आत्मविश्वास नडला.
काँग्रेस व उबाठा सेना अगोदरपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या मुंडावळ्या घेऊन तयार होते. गाफील आघाडीवर भाजपाने मात केलीच पण लाडकी बहीण योजना व ओबीसींनी भाजपा- महायुतीला महाप्रचंड बहुमत दिले. महाआघाडीचे ५० आमदारही निवडून आणता आले नाहीत मग इंडिया हवीच कशाला, अशी खदखद सुरू झाली. लोकसभेत अखिलेश यादव हे अगोदर पुढील रांगेत बसायचे, पण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांना मागे ३५५ क्रमांकाचे आसन मिळाले. अखिलेश यांनी धन्यवाद अशी प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली. हरियाणा व महाराष्ट्रातील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी इंडियाची निर्मिती आपण केली, पण आघाडीचे नेतृत्व बरोबर नाही, मला संधी मिळावी अशी टीप्पणी केली. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू- काश्मीर आणि झारखंड या चारही राज्यांत काँग्रेसचा जबर पराभव झाला. दिल्लीत कॉंग्रेस व आप एकमेकांच्या विरोधातच लढत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला जनतेचा विश्वास मिळवता आला नाही आणि इंडियातील मित्रपक्षांचाही कॉंग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. सन २०२५ मध्ये दिल्ली आणि बिहार, सन २०२६ मध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व केरळ, सन २०२७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे. गेल्या सात महिन्यांत इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही. कोणाची कोणाला गरज वाटत नाही. इंडिया आघाडीची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे.
[email protected]
[email protected]