Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Samruddhi Highway Decorated : समृद्धी महामार्गावरील बोगद्यांवर लोकसंस्कृतीचे दर्शन!

Samruddhi Highway Decorated : समृद्धी महामार्गावरील बोगद्यांवर लोकसंस्कृतीचे दर्शन!

मुंबई : एमएसआरडीसी नागपूर – मुंबई दरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) बांधत आहे. यापैकी ६२५ किमी लांबीचा महामार्ग पूर्ण झाला असून हा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. आता या महामार्गावरील इगतपुरी – आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे काम अतिशय वेगात सुरू आहे. उर्वरित कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अतिजलद प्रवास करताना आता चालकांसह प्रवासी यांना वारली लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे.



लोकसंस्कृतीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न


शेवटच्या टप्प्यातील ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर वारली चित्रकला, विपश्यना ध्यान साधना, शेती व्यवसायाची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. स्थानिक लोकसंस्कृतीची अनुभूती प्रवासादरम्यान प्रवासी – वाहनचालकांना घेता यावी आणि या लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने बोगद्यावर विविध लोकसंस्कृतीची चित्रे रेखाटण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.



निसर्गरम्य असा इगतपुरी परिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातोच, पण त्याचवेळी इगतपुरीमध्ये सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. त्यामुळे एका बोगद्यावर विपश्यना ध्यानसाधनेची माहिती चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर एका बोगद्यावर लोकजीवन, शेतीव्यवसाय आदीची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. लोकसंस्कृतीची अनुभूती देण्याचा, लोकसंस्कृतीचे संवर्धन करून बोगद्याच्या सौंदर्यात भर घालण्याच्या आणि प्रवाशांचा प्रवास एका वेगळ्या अुनुभूतीसह करण्याच्या उद्देशाने बोगदे चित्रांनी सजविण्यात आल्याचे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment