स्नेहभोजनामध्ये महायुतीच्या आमदारांशी साधणार सुसंवाद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. नौसेनेच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर पंतप्रधान मोदी कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी हे १५ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील. या दौऱ्यादरम्यानच ते महायुतीच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. या महायुतीच्या विजयाच्या वादळात विरोधी बाकावरील महाविकास आघाडीची वाताहात झाली. त्यानंतर सरकारच्या शपथविधीत पंतप्रधानांनी हजेरी लावली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांना नियोजित कार्यक्रमामुळे महायुतीच्या आमदारांना भेटता आले नव्हते. आता, मात्र, भाजपासह महायुतीचे मंत्री, आमदारांना पंतप्रधान भेटणार आहेत.
येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका पार पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली निघाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, राज्यात सगळ्याच पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे मिनी विधानसभेत घवघवीत यश मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. मुंबईसह, ठाणे, पुणे आणि इतर महापालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवली जाऊ शकते. त्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा महत्त्वाचा समजला जात आहे. विधानसभेतील यशाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पडावे यासाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे.