मातेश्वरी कंत्राटदाराच्या अचानक काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
अल्पेश म्हात्रे
मुंबई : एका महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यामुळे बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील वाहक व चालकांचे सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले . याचा थेट फटका बेस्ट प्रवाशांना बसला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून धारावी, प्रतीक्षानगर आगारातून एकही बस सुटू न शकल्यामुळे बस प्रवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले . तब्बल २१० बस सुटू न शकल्याने विविध बस थांब्यावर शेकडो प्रवासी बस वाट पाहत उभे राहिले.
गेल्या अनेक कालावधीपासून बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वाच्या बसवरील कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदारांचा विविध आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. सोमवारी बेस्ट उपक्रमाच्या मातेश्वरी कंपनीच्या धारावी व प्रतीक्षानगर आगारातील भाडेतत्त्वावरील वाहक, चालकांनी पहाटे पहिल्या फेरीपासून बस बंद केल्या. त्यामुळे धारावी, प्रतीक्षा नगर आगारातील बस फेऱ्यांवर परिणाम झाला. प्रतीक्षा नगर आगारात ११० बस आणि धारावी आगारात १०० बस उभ्या होत्या. तसेच या कंत्राटदाराच्या मजास, मुलुंड, वडाळा, सांताक्रूझ आगारात काहीसा परिणाम झाला. सकाळपासून आंदोलन सुरू झाल्याने, मुंबई शहर आणि उपनगरांत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी भाडेतत्त्वावरील बसच्या मार्गावर बेस्टच्या स्वमालकीच्या बस चालविण्यात आल्या. तर, प्रतीक्षा नगर आगारामधील बस दुपारी १२.२० पासून सुरू करण्यात आल्या.
Mumbai Accident : मुंबईत १२ व्या मजल्यावरून खाली कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, मातेश्वरी बस कंपनीच्या प्रतीक्षा नगर आगारातील महिला वाहक सुप्रिया कदम या गर्भवती असल्याने त्यांना बस गाडीवर कामाकरिता न पाठविता आगारामध्ये इतर हलके काम देण्यात यावे, अशी विनंती मातेश्वरी कंपनीकडे केली होती. यावेळी प्रतीक्षा नगरचे मातेश्वरी कंपनीचे आगार व्यवस्थापक सलीम खत्री यांनी महिला वाहक यांना दूरध्वनी करून भेटावयास यावे, असे सांगितले. याबद्दल गैरसमज होऊन माथाडी कामगारांचे सचिव प्रदीप मगरे व महिला वाहक सुप्रिया कदम यांनी सलीम खत्री यांना मारहाण केली. हे मारहाण प्रकरण सध्या वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बेस्ट उपक्रमातील मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रतीक्षा नगरमधील ११० बस बंद आहेत. बेस्टच्या मालकीच्या फक्त ३५ बस या आगारातून बाहेर पडल्या आहेत. मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमुळे लाखो प्रवाशांना वेठीस धरले आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी सुट्टी, रजा न घेता, जादा वेळ काम करावे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास योग्यरित्या होईल. तसेच प्रशासनाने स्वमालकीच्या ४ हजार बसचा ताफा लवकरात लवकर घ्यावा, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केले.