मुंबई : “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या बहुचर्चित चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या टीजरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटातलं “सुंदर परीवानी…” हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. अतिशय भावगर्भ शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे सुमधुर गाणं सर्वांच्याच आवडीचे होईल. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
“मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी गोष्ट सांगण्यात आली आहे. एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून तिच्या शोधाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. “सुंदर परीवानी, करून वेनीफनी दिसाया हवं झगामगा.. असे छान, सोपे शब्द असलेल्या या गाण्यात एका मुलीच्या भावभावनांचं चित्रण करण्यात आलं आहे. गावात राहणाऱ्या या मुलीचं घर, तिच्या घरातलं वातावरण, शाळा, मैत्रिणींबरोबरचं तिचं खेळणं यातून तिच्या भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे.
Bhogi Hair Wash Reason : भोगीच्या दिवशी केस धुण्याच्या परंपरेमागचं नेमकं कारण माहितीये का ?
चिनार – महेश यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचं लेखन मंगेश कांगणे यांनी केलं आहे. तर स्वरा बनसोडे या गायिकेनं हे गाणं गायलं आहे. बऱ्याच काळानं मुलांच्या भावविश्वाला साजेसं गाणं आलं आहे. त्यामुळे या गाण्याला विशेष दाद मिळणार यात शंका नाही.
मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कीमाया प्रॉडक्शनचे महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते असून त्यांची ही पहिलीच निर्मिति आहे. तर, वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार आहेत.