रत्नागिरी : दापोली तालुक्यातील ताडील गावातले रहिवासी आणि स्थानिक प्रभागाचे शिवसेना शाखाप्रमुख नैलेश चंद्रकांत चव्हाण यांचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समर्थक आणि शिवसेनेसाठी जीवाचं रान करणारा सच्चा कार्यकर्ता अशी नैलेश चव्हाणची ओळख होती. यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गृहराज्यमंत्री योगेश कदम हळहळले, त्यांनी दुःख व्यक्त केले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नैलेश चव्हाणने योगेश कदम यांचे काम केल होते. त्याच्यावर ज्या प्रभागाची जबाबदारी होती तिथून योगेश कदमांना मताधिक्य मिळवून दिले होते. योगेश कदम निवडणूक जिंकले नंतर गृहराज्यमंत्री झाले. या निमित्ताने मतदारसंघात आनंदसोहळा साजरा झाला. या सोहळ्यात नैलेश चव्हाण उत्साहाने सहभागी झाला होता. त्याने लाडक्या योगेशदादाची भेट घेतली होती आणि त्यांचे अभिनंदन केले होते. योगेश कदम यांची मतदारसंघात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नैलेश चव्हाण सहभागी झाला होता. आनंदात आणि उत्साहात असलेल्या नैलेशचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्यामुळे नैलेशला दोन दिवसापूर्वी दापोली शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नैलेशच्या हृदयाशी संबंधित समस्येवर मुंबईतच उपचार करावे, असा निर्णय झाला. नंतर त्याला मुंबईतील विलेपार्ले येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावातलेच असलेले शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते राजू बोथरे नैलेशसाठी धावपळ करत होते. शिवसेनेचे पदाधिकारी चव्हाण कुटुंबाच्या संपर्कात होते. उपचार सुरू झाले पण हृदयविकाराचा झटका आला आणि नैलेशची प्राणज्योत मालवली. नैलेशच्या मागे पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी असे कुटुंब आहे. काही महिन्यांपूर्वीच नैलेशच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. नैलेशवर ताडील गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.