ठाणे : ठाण्यातील नामांकित हॉटेलला भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. आग लागल्याने हॉटेल जळून खाक झाले आहे. सुमारे एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली गेली.
आज सकाळी ६.१५ वाजता उपवन तलावाजवळील बॉम्बे डक हॉटेलमध्ये भीषण आग लागली.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन कर्मचारी आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एक तासानंतर म्हणजेच सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवण्यात यश आलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीच्या तीव्रतेने धुरांचे लोट वाहू लागले. या धुरामध्ये गुदमरून एका मांजरीचा मृत्यू झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.