Thursday, January 16, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखNew Year : नव वर्ष अन् आपल्या जबाबदाऱ्या!

New Year : नव वर्ष अन् आपल्या जबाबदाऱ्या!

नव वर्ष, नवा आरंभ नमस्कार! २०२५ हे वर्ष संयुक्तराष्ट्र महासभेने क्वाॅटम (quatam) विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे. या सहकारिता वर्षात परस्परांना सहकार्य आणि प्रोत्साहन देत नव्या वर्षाचे स्वागत करू या. क्वाॅटम विज्ञान ही भौतिक शास्त्राची एक महत्त्वाची शाखा असून तेथे अतिसूक्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.

– मृणालिनी कुलकर्णी

नव वर्ष : नवा संकल्प : स्वतःचे स्वप्न साकार करण्यासाठी केलेला संकल्प जीवनात बदल घडवून आणतो. वैयक्तिक संकल्पापेक्षा देशातील किंवा समाजातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे नव वर्ष एक चांगली संधी आहे. कारण नव वर्ष आनंदाबरोबर नव्या अपेक्षा आणते. आपण सर्वांनी देशाच्या प्रश्नासाठी संकल्प करून आपली जबाबदारी उचलू या. जागतिक हवामान परिषदेत “प्रत्येक राष्ट्रांनी आपापल्या कार्बन उत्सर्जनात कपात करावी” असा करार मंजूर झाला. जीवसृष्टी नष्ट होत असताना “जगातून २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन” हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कोळशाचा इंधनाचा कमीत कमी वापर करून इतर नूतनीकरण ऊर्जेकडे किंवा अक्षय ऊर्जेकडे (सौर, पवन) वळणे जरुरी आहे. हवामान बदल ही जागतिक समस्या धर्म, जात, पंथ, वर्ग, वर्ण असा भेद न करता समस्त लोकांचे हाल वाढवीत आहे. जगापुढील पर्यायाने भारतापुढेही हा ज्वलंत प्रश्न आहे. आपल्यापुढील पहिले आव्हान हवामान बदलाचे परिणाम आपण पाहत आहोत. नवी दिल्लीत हवेचा दर्जा अत्यंत खाली घसरला आहे. मुंबईतील हवा धुरकट. जनता सातत्याने आजारी. यावर्षी दिवाळीपर्यंत पडणाऱ्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान, या साऱ्याला आपणच जबादार आहोत. कारखान्यांमधून बाहेर पडणारे पाणी, हवा त्याहीपेक्षा किंवा त्याचबरोबरीने आपल्या घराघरांत अन्न, पाणी, विजेची होत असलेली नासाडी, कचरा बाहेर टाकणे, थुंकणे, रोजच्या रोज दूध-भाजीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर, मोसमाच्या आधी फळे पिकविणे या सर्वसामान्यांच्या कृतीच हवामान बदलला कारणीभूत आहेत हे सिद्ध झालंय.

दुसरे आव्हान “सलोखा” बहुभाषिक, बहुप्रांतीय भारतात समस्यांना चौकट घालताच येणार नाही. समस्या असूनही प्रत्येकाच्या रोजच्या मैत्रीमध्ये विभिन्न भाषिक, प्रांतीय, धर्मीय सण उत्सवात एकोपा/देवघेव खूप चांगली आहे; परंतु त्या जवळच्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त जो तो आपल्यामध्येच. ओळखत असूनही ओळखच नाही असे वागणे असते. काही अपवाद वगळता माणसामाणसांत, नात्यांत इतका तुटकपणा, अलिप्तपणा वाढलाय. कुणालाही एकमेकांशी बोलायला, बघायला किंवा मदतीसाठी स्वतःचा वेळ द्यायलाही तयार नाहीत. शेजारचे १० दिवस नव्हते तरी आम्हाला समजले नाही. माणूस माणसापासून दुरावत चाललाय. तेव्हा स्वतःहून हात पुढे करा. तिसरा प्रश्न : मोबाईल; मास मीडियामुळे जग जवळ आले. मोजके अपवाद वगळता त्याचा उपयोग स्वतःचा आवाका वाढविण्यासाठी, स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी न होता सेल्फी,चॅटिंगमध्ये वेळ जातोय. रिमोट जरी आपल्या हातात असला तरी स्वतःवर ताबा नसतो. चौथा प्रश्न घरचे खाणे, भविष्याकडे पाहता आजची गरज हा उद्याचा यक्षप्रश्न ठरतो. आरोग्यासाठी नितांत गरज असलेल्या घरच्या खाण्यासाठी स्वयंपाकात प्रत्येकाचा सहभाग असावा. माहीत असलेल्याच प्रश्नाकडे नवी आव्हाने म्हणून नव्याने मूल्यमापनाची गरज आहे. म्हणून “नव वर्ष : आपल्या जबाबदाऱ्या “हे शीर्षक लिहिले.

“मला समाजासाठी काहीतरी करायचे, मला असा बदल घडवून आणायचा आहे जो इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल. “कॉलेज युवती प्राची शेवगांवकर. तिने स्वतःचे, त्याशिवाय ११० देशांतील लोकांच्या मदतीने २५ लाख कार्बन उत्सर्जन कमी केले. विचार करा, आपण येथे काय करू शकतो. १. आज प्रत्येकाची गाडी, उबेर, रिक्षामधून होणारा स्वतंत्र प्रवास, प्रत्येक टप्प्यावर कार्बन फूट प्रिंट वाढवतो. २. लिफ्टमुळे एक-दोन जिनेही चढण्याचा आज तरुण कंटाळा करतात. ३. आपण वीज गेल्यावर काहीकाळ राहतो; परंतु वीज असताना दहा मिनिटेही वीज बंद ठेवत नाही. ४. टप्प्याप्प्प्याने प्लास्टिकचा वाढणारा वापर आपण कमी करू शकत नाही. आपल्यासमोरील विक्रेत्याला, ग्राहकाला सांगूनही उपयोग होत नाही. हे जमिनीवर पडलेले प्लास्टिक, त्या प्लास्टिकमुळे होणारे समुद्राचे प्रदूषण, त्यातून धोक्यात आलेली सागरी परिसंस्था वाचविण्यासाठी नेदरलँडच्या १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने “लीली प्लॅट” हिने प्लास्टिक मुक्तीसाठी “प्लास्टिक सूप” ही मोहीम जगभर सुरू केली. युनायटेड नेशनने ती मोहीम उचलून धरली. ५. वापरा आणि फेका ऐवजी बऱ्याच वस्तूचा आपण पुनर्वापर करू शकतो. पुनर्वापर करणे ही कंजूसी नव्हे. ६. प्रत्येक वॉर्डमध्ये विशिष्ट जागी हरित पट्याची बांधणी हवी. ७. आपल्या पंतप्रधानांचा मंत्र आईच्या नावाने {कमीतकमी} एक झाड लावा नि जोपासा. मुंबईत राणीच्या बागेत गेट नंबर ४ येथे अगदी कमी पैशात मोठी वाढणारी झाडे दिली जातात. ८. सार्वजनिक वाहनांचा उपयोग करणे आता गरजेचे आहे.

सुमेधा चिथडे ह्यांनी लोकांच्या मदतीने सियाचीन येथे प्रथम, नंतर जम्मू-काश्मीर मधल्या कुपवाडा येथे सैनिकांसाठी पहिला ऑक्सिजन प्लांट व रिफिलिंग सेंटर उभे केले आहे. देश आणि समाजातील प्रश्नांवर अनेक व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत. त्यांना हातभार लावू शकतो, सहभागीही होऊ शकतो. मी भारतीय आहे. आपली जबाबदारी ओळखा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा ठरावी यासाठी माझ्या शुभेच्छा!
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -