Thursday, May 15, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मुंबईत 'मेट्रो २ अ' आणि 'मेट्रो ७' ताशी ८० किमी वेगाने धावणार

मुंबईत 'मेट्रो २ अ' आणि 'मेट्रो ७' ताशी ८० किमी वेगाने धावणार
मुंबई : 'दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ' आणि 'दहिसर – गुंदवली मेट्रो ७' या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या वेगाने पळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही मार्गिकांवरील नियमित संचलनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे दोन्ही मार्गिकांवर आता ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावू शकतील. सध्या या मार्गिकांवर ताशी ५० ते ६० किमी वेगाने मेट्रो धावतात.



मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ मार्गिका १८.६ किमी लांबीची असून यात १७ स्थानकांचा समावेश आहे. तर ‘मेट्रो ७’ मार्गिका १६.५ किमी लांबीची असून यावर एकूण १३ स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा जानेवारी २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल आणि या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. या दोन्ही मार्गिकांना मुंबईकरांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या या दोन्ही मार्गिकांवरुन अडीच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. आता या मार्गिकांवरुन १५ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे. वेगवान, सुकर, सुरक्षित प्रवासामुळे मेट्रोला प्रवाशांची पसंती मिळते. आता या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या आणखी वेगाने धावणार आहेत.



अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ' आणि 'दहिसर – गुंदवली मेट्रो ७' या मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांना मेट्रो संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले होते. यामुळे दोन्ही मार्गिकांवर मेट्रो गाड्या ताशी ५० ते ६० किमी वेगाने धावत होत्या. आता या मार्गिकांच्या नियमित संचलनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे दोन्ही मार्गिकांवर मेट्रो गाड्या ताशी ८० किमी वेगाने धावू शकतील.



मुंबईकरांना वेगवान, सुरक्षित, सुकर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. 'मेट्रो २ अ' आणि 'मेट्रो ७' ला नियमित संचलनासाठी सीसीआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे महायुती सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून आणखी एक वचन पूर्ण केले आहे. आता मेट्रोचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment