बीड : बीड येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी द्यावी यासाठी आज वाशीम येथे सर्व पक्षीय-सर्व धर्मीय संघटना, सेवाभावी संस्था, आणि संवेदनशील नागरिकांच्यावतीने महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू व इतर राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
न्यायासाठी लढत राहू
बीड हत्याकांडातील ७ आरोपीवर मोक्का लावण्यात आला मात्र घटनेतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीत आणि कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी लढत राहू अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
हा मोर्चा भव्य असून वाशीम छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. नंतर पाटणी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांद्वारे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Santosh Deshmukh)