गडावर जाण्यासाठी पर्यटक, भाविकांना अटी, शर्थी लावून परवानगी
शाहूवाडी : विशाळगड (ता. शाहूवाडी) येथे रविवारी (दि.१२) होणाऱ्या उरुस उत्सवाला (Urus at Vishalgad) जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली आहे. नुकतीच विशाळगडावर पर्यटक आणि भाविकांना जाण्यासाठी अटी व शर्थी लावून परवानगी दिली आहे. परंतु, गडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई पूर्ण होत नाही. तोपर्यंत गडावर कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन विशाळगडावर होणाऱ्या उरुसासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. हिंदुत्ववादी नेते, मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विशाळगडावर उरुस होऊ देणार नाही, असा इशारा सांगलीत दिल्यानंतर शेजारीच असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ऊरुसाला परवानगी नाकारली आहे.
Santosh Deshmukh Death Case : संतोष देशमुख घटनेच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मूक मोर्चा !
विशाळगड मुक्ती आंदोलन १४ जुलै २०२४ रोजी झाले होते. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर विशाळगड पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी दिली असली तरी पर्यटकांना नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. पर्यटकांनी नियमांचे व अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. प्रशासनाने परवानगी दिल्याने गडवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र पर्यटकांना ३१ जानेवारीपर्यंतच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशाळगडावर जाता येणार आहे.
कारवाई पूर्ण होईपर्यंत सण, उत्सवांना मनाई
विशाळगडावर पर्यटक, भाविकांना जाण्यासाठी अटी आणि शर्थी लावून परवानगी दिली असली तरी गडावरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत गडावर कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये, या पार्श्वभूमीवर सावधानतेचे पाऊल म्हणून प्रशासनाने उरूसाची परवानगी नाकारल्याची माहिती आहे. मात्र, आता प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे विशाळगडावर शुकशुकाट असून येथे उरूस साजरा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्री नितेश राणे यांनी दिला होता इशारा
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगलीत हिंदू मोर्चात बोलताना विशाळगडावर उरूस कसा साजरा होतो तेच पाहतो, असा इशारा दिला होता. अन्य धर्मियांनी हिंदू समाजाच्या भावना भडकतील, असे कोणतेही कृत्य करू नये. शासन म्हणून आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत, असे नितेश राणे म्हणाले होते. या इशाऱ्यानंतर मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन विशाळगडावर होणाऱ्या उरुसासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
विशाळगड पर्यटकांसाठी खुला, पण प्रशासनाचे नियम बंधनकारक
दंगलीनंतर तब्बल पाच महिन्यांनंतर किल्ले विशाळगड पर्यटक, दुर्गप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटी घातल्या असून, गडावर मांसाहार करण्यास आणि सायंकाळी पाचनंतर थांबण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.