मुंबई : आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेलाआणि कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेला ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाने २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना गौरविण्यात येणार आहे.अंधेरीच्या मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात महोत्सवाचा शुभारंभ १० जानेवारीला सायं ६.३० वा. होणार आहे.‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे रंगणार आहे.
हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत पण आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशाने आम्ही अनेक उत्तम चित्रपट या महोत्सवात दाखवणार असल्याचे फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सांगितले.