कॅनडाहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात
नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये मगरीची कवटी आढळून आली आहे. हा प्रवासी कॅनडाहून आला असून विमानतळावर बॅगची तपासणी करताना ही कवटी आढळून आली. संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर केले नसले तरी त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅनडाहून भारतात आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाची बॅग तपासताना काहीतरी अणकुचीदार लागले. त्यामुळे त्याच्या बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या बॅगमधून मगरीच्या पिल्लाची कवटी सापडली. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत एका क्रिमी रंगाच्या कपड्यामध्ये मगरीच्या पिलाची कवटी गुंडाळली होती. ही कवटी सुमारे ७७७ ग्रॅम वजनाची आहे अशी माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भातील निवेदनात कस्टम अधिकारी म्हणाले की, भारतात संरक्षित असणाऱ्या मगरीची ही कवटी आहे.
भारतीय वन्यजीव कायद्याचा भंग केल्याचा व कस्टम कायद्याचा भंग केल्याचा ठपका संबधित युवकावर ठेवला आहे. संरक्षित असलेल्या प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणे हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून आता याबाबात कस्टम ऑफिस व वन्यजीव कार्यालय या दोन्हीच्या संयुक्तरितीने कारवाई केली जाणार आहे. ही मगरीची कवटी आता वन्यजीव कार्यालयाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून. याची आता तपासणी केली जाणार आहे. भारतामध्ये २०११ ते २०२० या कालावधीत विमानतळावरुन वन्यजीवांच्या अवयवांची तस्करीच्या १४१ घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये जवळपास १४६ प्रकारच्या वन्यजीवांची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला होता. कासव, साप, पाली आदींचा यामध्ये समावेश आहे.