रस्ता खोदून ठेवल्याने चालक, प्रवासी हैराण
वाडा : बहुचर्चित व वर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. मात्र सदरचे काम हे अत्यंत कासवगतीने सुरू असून सदरचे काम हे ईगल कंपनीस दिल्याचे समजते या कंपनीकडून हा मार्ग गेल्या दिड महिन्यापासून खाेदलेल्या अवस्थेत आहे. या महामार्गाच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता राखुन काम जलदगतीने होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) रमेश भोईर यांनी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
Palghar Water Shortage : पालघर जिल्ह्यात महिलांची पाण्यासाठी वणवण थांबणार?
वाडा-भिवंडी महामार्गावर गांधरे, शिरीषपाडा, कुडूस, वडवली, नारे, घोणसई फाटा, मुसारणे फाटा, डाकिवली, अंबाडी, दुगाड फाटा या ठिकाणी एका बाजुचा रस्ता खोदून ठेवल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावरील माती, धुळीमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. सुरू असलेले खोदकाम निविदेनुसार होत आहे किंवा नाही? तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता याकडे कानाडाेळा करत असल्यामुळे शासनाचे करोंडो रुपये पुन्हा वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे प्रवाशांकडून बाेलले जात आहे.