Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीश्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात

श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात

परराज्यांतील रोपांमुळे मूळ प्रत घसरण्याची भीती

सुपारी बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता

अलिबाग : कोकणातील सुपारीच्या बागा निसर्गाच्या चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना या बागा नव्याने उभ्या करण्यासाठी शासनातर्फे विविध राज्यांतील सुपारीची रोपे आणून पुरविली गेली; परंतू ही रोपे श्रीवर्धनच्या जगप्रसिद्ध रोठा सुपारीच्या (Rotha Betel nut) मुळावर उठली आहेत. या रोपांमुळे रोठा सुपारीची मूळ प्रत घसरण्याची भीती स्थानिक बागायतदार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे भविष्यात येथील सुपारी बागायतदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रायगड जिल्ह्यात साधारणत: पाच हजार हेक्टरवर सुपारीची लागवड केली जाते. यातून दरवर्षी साधारणतः ३५ ते ४० कोटींची उलाढाल होते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीची मोठी लागवड केली जाते. भौगोलिकदृष्ट्या या परिसरात सुपारीसाठी अत्यंत पोषक वातावरण उपलब्ध आहे. त्यामुळे सुपारी लागवडीकडे बागायतदारांचा विशेष कल असतो.

रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार! प्रजासत्ताक दिनी आदिवासी बांधव माथेरान घाट रस्ता रोखणार!

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर चार वर्षांपूर्वी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सुपारीचे पीक धोक्यात आणले आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग येथील ९० टक्के सुपारीच्या बागा वादळाच्या तडाख्याने भुईसपाट झाल्या. सुपारीची लाखो झाडे वादळात उन्मळून पडली. वादळाच्या या धक्क्यातून किमान १० वर्षे बागायतदार सावरू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. कारण, सुपारीचे एक झाड उत्पादनक्षम होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागतो. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता शासनाने येथील बागायतदारांना १०० टक्के अनुदानावर सुपारीची रोपे पुरविली होती. ही रोपे परराज्यातून आणण्यात आली होती. ही रोपे भविष्यात श्रीवर्धनच्या जगप्रसिद्ध रोठा सुपारीसाठी धोकादायक ठरू शकतात, अशी बागायतदारांना भीती वाटत आहे. कारण, सुपारी हे क्रॉस पालिनेटेड (परपरागण) पीक आहे. परागीभवन प्रक्रिया होताना स्थानिक रोठा सुपारी आणि परराज्यातील सुपारी यांचा संकर होऊन मूळ रोठा सुपारीला याचा धोका होऊन मूळ प्रत खालावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

रोठा सुपारीला विदेशातही मागणी

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवदार असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांत निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने या सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही वाजवी असते. त्यामुळे फळपीक म्हणून सुपारी लागवड केली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -