पिंपरी : महानगरपालिका आणि पांढरे उंदीर (White rats) खरेदी, ती ही नऊ लाख रुपयांची… जरा आश्चर्य वाटले ना? थांबा, सविस्तर बातमी वाचा…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संभाजीनगर येथे संत बहिणाबाई चौधरी संग्रहालय उभारले असून या प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ५० ते ६० पक्षी, २ मगर आणि वेगवेगळ्या १३ जातीचे ५३ विषारी आणि बिनविषारी साप सांभाळले आहेत. सापांचे खाद्य उंदीर असल्याने या १३ जातीच्या सापांसाठी दोन वर्षासाठी ५,४०० पांढरे उंदीर विकत घेण्यासाठी महापालिका पशुवैद्यकीय विभागातर्फे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
विविध जातीच्या ५३ सापांना महिन्यासाठी २२५ उंदीर खाद्य आवश्यक असून एका पांढऱ्या उंदिराची अंदाजे किंमत १६० ते १७० रुपये अपेक्षित असून ७ ते २१ जानेवारीपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.
७ वर्षापासून संग्रहालय बंद!
संत बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय हे संभाजीनगर आकुर्डी येथे महापालिकेने उभारले असून २४ कोटी रुपये खर्च करून या प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे काम सुरू असल्याने गेली ७ वर्षापासून पर्यटकांना या ठिकाणी जाता येत नाही.
या संग्रहालयात पर्यटकांना जाण्यासाठी आणखी किमान एक वर्ष तरी थांबावे लागणार आहे. प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद असले तरी आतील साप आणि प्राणी यांची देखभाल करणे आवश्यक असल्याने सापासाठी ९,०७,२०० रुपयांचे पांढरे उंदीर खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती महापालिका उपयुक्त आणि पशू वैद्यकीय अधिकारी संदीप खोत यांनी दिली.