Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune : मुली कपडे बदलायला गेल्या आणि हादरल्या, पुण्याच्या शाळेत धक्कादायक प्रकार

Pune : मुली कपडे बदलायला गेल्या आणि हादरल्या, पुण्याच्या शाळेत धक्कादायक प्रकार
पुणे : शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख मिरवणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. खेळाचा तास संपल्यावर विद्यार्थिनी कपडे बदलण्यासाठी गेल्या त्यावेळी खोलीत मोबाईल बघून मुली घाबरल्या. खोलीतल्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडीओ मोडवर होता. मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू होते. हा प्रकार लक्षात येताच मुलींनी मोबाईल ताब्यात घेऊन व्हिडीओ डीलीट केला. घडलेल्या घटनेची माहिती मुलींनी घरी दिली. यानंतर मुलींच्या पालकांनी तातडीने शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. शाळा व्यवस्थापनाने या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केला आणि मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याला अटक केली.



ज्या शाळेत व्हिडीओ रेकॉर्डिंग झाले होते त्याच शाळेचा शिपाई तुषार सरोदे हा प्रकार करत होता. शाळेत खेळाच्या तासासाठी विद्यार्थिनी निराळे कपडे वापरतात आणि एरवीच्या तासांसाठी गणवेशात असतात हे तुषारला माहिती होते. यामुळे मुली कपडे बदलण्यासाठी येण्याआधीच खोलीत मोबाईल लपवून त्याद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचा कट तुषार अमलात आणत होता.



सुरुवातीला आरोप फेटाळणाऱ्या तुषारने अखेर शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. विद्यार्थिनी येण्याच्या सुमारास खोलीत मोबाईल ठेवून मुलींचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी पोलिसांनी तुषार विरोधात पॉक्सो आणि भारत न्याय संहितेच्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



पुण्यातील एका नामांकीत शाळेत मुलींचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रकार सुरू असल्याचे कळल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या प्रकरणात दोषी व्यक्ती विरोधात कायद्याच्या चौकटीत राहून कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
Comments
Add Comment