नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या भारतपोल या पोर्टलचे लाँचिंग केले. इंटरपोलच्या धर्तीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित सीबीआय भारतपोल हे पोर्टल हाताळणार आहे. भारतातील सर्व राज्यांची पोलीस यंत्रणा या पोर्टलच्या माध्यमातून थेट सीबीआय आणि देशातील इतर राज्यांच्या पोलिसांच्या यंत्रणेच्या संपर्कात राहणार आहे. एखाद्या ‘वाँटेड’ आरोपीची माहिती आणि फोटो पोलीस भारतपोल या पोर्टलवर अपलोड करतील. ही माहिती बघून कोणत्याही राज्याचे पोलीस संबंधित आरोपी आपल्या राज्यात आहे की नाही याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करू शकतील. तसेच पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीद्वारे राज्यांचे पोलीस ऑनलाईन पद्धतीने इंटरपोलचीही मदत घेऊ शकतील. या प्रक्रियेत सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांना पोलिसांनी इंटरपोलकडून कोणती मदत मागितली आहे आणि त्याला इंटरपोलकडून मिळालेला प्रतिसाद याबाबतची ताजी माहिती भारतपोल या पोर्टलवर मिळेल.
भारतपोल या पोर्टलमुळे फरार आरोपींना शोधून पकडण्यासाठी मोलाची मदत मिळणार आहे. तसेच भारतपोल या पोर्टलमुळे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटीत गुन्हे, मानवी तस्करी यांना आळा घालण्यास मदत होईल. राज्यातून अथवा देशातून फरार झालेल्यांना शोधून पकडण्याची कारवाई सोपी होण्यास मदत होईल. सीबीआयच्या भारतपोल या पोर्टलद्वारे केंद्रीय गृहमंत्रालय तसेच सीबीआय, एनआयए, ईडी आदी गुन्हे अन्वेषण करणाऱ्या सर्व केंद्रीय तपास यंत्रणा तसेच राज्यांच्या पोलीस यंत्रणा यांना एकमेकांच्या संपर्कात राहणे आणि आवश्यकतेनुसार इंटरपोलची मदत घेणे सोपे होणार आहे.
इंटरपोल म्हणजे काय ?
इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन किंवा इंटरनॅशनल पोलीस. ही संस्था सदस्य देशांच्या सर्व सुरक्षा संस्थांना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मदत करते. यासाठी आवश्यक तो समन्वय इंटरपोल साधते. इंटरपोलची स्थापना १९२३ मध्ये झाली आणि भारत १९४९ पासून या संघटनेचा सदस्य आहे. सध्या १९६ देश इंटरपोलचे सदस्य आहेत. यामुळे इंटरपोल ही संयुक्त राष्ट्रांनंतरची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.