
/>
बिश्नोई टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली असा आरोप मुंबई पोलिसांनी आरोपपत्राद्वारे केला आहे. सलमानचे हितचिंतक असल्यामुळे बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न बिश्नोई टोळीने केला. प्रत्यक्षात फरार असलेल्या झीशान अख्तर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई या तीन आरोपींनी बिश्नोई टोळीला मुंबईत पाय पसरणे सोपे व्हावे यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली असा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे.
/>
आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा थेट उल्लेख नाही. आरोपी, फरार आरोपी अशा कोणत्याही स्वरुपात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा आरोपपत्रात उल्लेख दिसत नाही. यामुळे लॉरेन्स बिश्नोईचा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशी अप्रत्यक्षरित्या संबंध असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे तीन कारणं असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. सलमानशी असलेली जवळीक, अनुज थापनच्या आत्महत्येचा बदला आणि बिश्नोई टोळीचा प्रभाव निर्माण करणे या तीन कारणांसाठी बाबा सिद्दीकींच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.