मुंबई : भारतीय संघाचा क्रिकेटर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कोरिओग्राफर धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. चहल आणि धनश्री दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, अशी चर्चा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे रंगली आहे. आता या चर्चेदरम्यान चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलोसुद्धा केलं आहे.
इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्रने धनश्रीबरोबरचे सर्व फोटो उडवून टाकले आहेत. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. दुसरीकडे घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत. ते अधिकृतपणे मान्य होण्याआधी काही वेळ बाकी आहे. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु हे स्पष्ट आहे की या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२३ मध्ये धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नावामधून पती युजवेंद्रचे आडनाव ‘चहल’ काढून टाकले होते. त्यानंतर घटस्फोटाच्या अफवांना वेग आला होता. युझवेंद्रने “नवीन आयुष्य सुरू होत आहे” अशी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्यानंतर हा बदल झाला. मात्र, त्यावेळी क्रिकेटपटूने घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते आणि चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नका असे सांगितले होते.