Saturday, February 8, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखNavi Mumbai : नवी मुंबईत पोलिसांचा धाक राहिला नाही का?

Navi Mumbai : नवी मुंबईत पोलिसांचा धाक राहिला नाही का?

जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या डी मार्ट परिसरात दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला. एकूण पाच गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्टेशनबाहेरील डी मार्टनजीक सकाळी १०च्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या, त्यांनी गाडी थांबवत पाच गोळ्या झाडल्या. यात एक व्यक्ती जखमी झाली असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर कायम गर्दी असणारा आहे. अशा गर्दीतून गोळ्या झाडणारे आपली दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले. सकाळी १० वाजता गोळीबार होतो, तेही वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करण्याचे धाडस हल्लेखोरांकडून दाखविण्यात येते, याचाच अर्थ हल्लेखोरांना नवी मुंबई पोलिसांचे कोणतेही भय राहिलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईत गोळीबाराच्या घटना हा काही प्रथमच प्रकार घडलेला नाही. अधूनमधून या घटना घडतच असतात. गोळीबाराची घटना ज्या ठिकाणी घडली, त्यापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ बरोडामध्ये भुयारी सुरुंग खणून बँक लुटण्याची घटना घडली होती. ज्वेलर्सची दुकाने असो, बांधकाम व्यवसायिक असो, शासकीय अधिकारी असो, गोळीबाराच्या घटना नवी मुंबईत ठरावीक अंतराने होतच असतात. मुळात मुंबईतील लोकसंख्या कमी करण्यासाठी, मुंबईत लोकसंख्येचे वाढते प्रमाण पाहिल्यावर लोकसंख्येचा स्फोट टाळण्यासाठी राज्य सरकारने मुंबई शहरानजीक नवी मुंबई शहराची निर्मिती केली. नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्यावर तसेच खाडीअंर्तगत भागात सिमेंटचे जंगल वसविले. निवासी परिसर वाढविताना रोजगाराला प्राधान्य देण्यासाठी एमआयडीसी विकसित करण्यात आली. नवी मुंबई शहर विकसित करताना केवळ लोकसंख्येचेच स्थंलातर झाले, अशातला भाग नाही. मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईच्या विविध भागांत विखुरलेल्या विविध बाजारपेठा नवी मुंबईतील तुर्भे येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात एकाच छताखाली आणण्यात आल्या.

मुंबईतील लोक नवी मुंबईत येत असताना मुंबईतील अपप्रवृत्तींचे, गुन्हेगारी घटकांचेही नवी मुंबईत आगमन झाले. हे धोके ओळखण्यात राज्य सरकारला मर्यादा पडल्या. आजही नवी मुंबई शहरामध्ये बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. नायजेरियन नागरिकांचेही गावठाण भागामध्ये निवासी वास्तव्य खुलेआमपणे पाहावयास मिळते. सदनिकांमध्ये भाडेकरू ठेवल्यावर त्या त्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तशी नोंद ठेवणे बंधनकारक आहे. पोलीस ठाण्याला कळविले नसल्यास सदनिकाधारकावर गुन्हा दाखल होतो; परंतु नवी मुंबईत भाडेकरूंचे प्रमाण लक्षणीय असतानाही नवी मुंबई शहरामध्ये भाडेकरूंची पोलीस ठाण्यामध्ये कागदोपत्री नोंद असण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पोलिसांकडून झाडाझडती घेतले जात नसल्याने भाडेकरूंची नोंद करण्याबाबतची उदासीनता वाढीस लागली आहे. त्यामुळे भाडेकरू म्हणून येणारा नागरिक सज्जन आहे का गुन्हेगार आहे, याबाबत सोसायटीतील रहिवाशांनाही कोणती माहिती मिळत नाही. मुंबईतून बाजारपेठा नवी मुंबईत स्थंलातरीत होत असताना दादर, भायखळा मार्केटमधील गुन्हेगारी घटकांचे नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये स्थंलातर झाले. या घटकांचा अलीकडच्या काळात प्रभाव कमी झाला असला तरी संपुष्टांत मात्र आलेला नाही. बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये या गुन्हेगारी घटकांचा काही काळ उघडपणे प्रभाव पाहावयास मिळाला होता. काही आजी-माजी बाजार समिती संचालकांची गुन्हेगारी वर्तुळात ऊठबस असल्याची चर्चा आजही बाजार आवारातील घटकांमध्ये उघडपणे होत आहे.

बाजार समिती आवारात गुन्हेगारी घटकांचा वावर ही गोष्ट आता लपून राहीलेली नाही. बाजार समिती आवारात कृषी माल न येता परस्पर मुंबई शहर, उपनगरात तसेच अन्य भागांत जात असल्याने कृषी मालाचा अवैध अनधिकृत व्यापार, त्यामागे होणारे करोडोंचे त्याकाळी होणारे अर्थकारण, गुन्हेगारी टोळ्यांचे हितसंबंध, प्रभाव यामागे गुन्हेगारी वर्गाचा वरदहस्त असल्याचे गेली अनेक वर्षे उघडपणे पाहावयास मिळत होते. कृषी मालाच्या अनधिकृत, अवैध व्यापारास विरोध केल्याने बाजार समितीचे सचिव अण्णासाहेब गोपाळराव तांभाळे यांची बाजार समिती आवाराच्या मुख्यालयाच्या तळाशीच मंजू रई व विनोद साहू यांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती. अर्थात मंजू रई व विनोद साहू हे सुपारीबाज असले तरी खरे गुन्हेगार वेगळेच होते. त्यांची नावे आजही उजेडात येऊ शकलेली नाहीत. बांधकाम व्यवसायाला नवी मुंबईमध्ये नेहमीच सुगीचे दिवस असल्याने येथील सदनिकांच्या दरामध्ये तेजी येण्याचे प्रकार आजही कायम आहेत. पूर्वी नवी मुंबई शहर विकसित होत असताना इमारती वाढत गेल्या आणि शहर सिमेंटचे जंगल बनले असताना टॉवरच्या नावाखाली रिडेव्हलपमेंट वेगाने सुरू झाली. सोसायटींचे रिडेव्हलपमेंट कोणी करायची, इमारत कोणी पाडायची, त्यातील मिळणारा मलिदा कोणी घ्यायचा, यावरून राजकीय व बिल्डर लॉबीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारामध्ये हा मुद्दा काही राजकीय घटकांकडून वापरण्यात आला होता. नवी मुंबईत असलेल्या दोन मतदारसंघांमध्ये बेलापूरच्या तुलनेत ऐरोली मतदारसंघात वातावरण अधूनमधून अशांत असते. नवी मुंबईत नगरसेवकांच्या हत्या झाल्या आहेत. ऐरोली, दिघा एकेकाळी गुन्हेगारी घटनांचे माहेरघर होते, तर बेलापूर मतदारसंघामध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला.

एकेकाळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ओळखले जाणारे घटक आज व्हॉईट कॉलर राजकारणी बनले आहेत, तर काही राजकारण्यांकडून आपल्या विरोधकांना जायबंदी करण्याच्या, धमक्या देण्याची प्रकरणे अधूनमधून घडत असतात. कोपरखैराणेतील माथाडी वसाहतीमध्ये हाणामारीच्या, जायबंदी करण्याच्या घटना घडतच असतात. जुईनगर, सानपाडा पामबीच भागात ज्वेलर्सच्या दुकानांवर यापूर्वीही गोळीबार झाले आहेत. त्यातच नवी मुंबईमध्ये लेडिज बिअरबारमुळे येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. गावठाण भागात बारबालांचे निवासी वास्तव्य असल्याने त्यांच्याकडेही गुन्हेगारी घटकांचा राबता असतो. दिघा ते बेलापूरदरम्यान वसलेल्या नवी मुंबई शहरामधील गुन्हेगारीचा वाढता आलेख पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. फेरीवाल्यांनी पदपथ गिळंकृत केले असून गोवंडी, मानखुर्द, मुंब्रा भागातील घटकांचा फेरीविक्रेत्यांमध्ये सहभाग आहे. गुन्हेगारी घटनांसाठी नवी मुंबई शहरामध्ये अनुकूल वातावरण असल्याने नजीकच्या काळात नवी मुंबई शहर गुन्हेगारांचे माहेरघर बनल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -