Wednesday, May 21, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

चीनमध्ये नवे संसर्गजन्य आजार, पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

चीनमध्ये नवे संसर्गजन्य आजार, पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
बीजिंग : कोरोना संकटाची सुरुवात चीनमधून झाली. या आजारामुळे चीनसह जगातील अनेक देशांना लॉकडाऊन करावे लागले. यामुळे अर्थचक्र मंदावले. अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांवर गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम झाले. या संकटातून जग सावरत असतानाच चीनमध्ये पुन्हा एकदा वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांनी डोकं वर काढलं आहे. मानवी मेटाप्युमोव्हायरस सक्रीय झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप चीन सरकारने या विषयावर भाष्य केलेले नाही. पण सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मानवी मेटाप्युमोव्हायरसची कमी - जास्त प्रमाणात बाधा झाल्यामुळे इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोविड-१९ असे वेगवेगळे संसर्गजन्य आजार पसरू लागले आहेत; अशा स्वरुपाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.





रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने चीन संदर्भात एक वृत्त दिले आहेत. या वृत्तात चीनच्या रोग नियंत्रण प्राधिकरणाने अज्ञात न्यूमोनिया संकट निर्माण झाल्यामुळे काही भागात दक्षतेचा इशारा दिल्याचे नमूद आहे. मार्च २०२५ पर्यंत चीनमध्ये संसर्गजन्य आजारांनी बाधीत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती चीनच्या रोग नियंत्रण प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात सध्या १४ वर्षांखालील मुलांमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चीनमधील घडामोडींवर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं बारकाईने लक्ष ठेवून आहेत.





सध्या मानवी मेटाप्युमोव्हायरसला आळा घालण्यासाठी लस अस्तित्वात नाही. तसेच मानवी मेटाप्युमोव्हायरसची बाधा झाल्यास बरे करण्यासाठी एकही ठोस औषध उपलब्ध नाही. रुग्णाला मानवी मेटाप्युमोव्हायरसची बाधा झाली तर सुरुवातीला सर्दी - खोकला, ताप अशी सामान्य लक्षणे दिसतात आणि हळू हळू परिस्थिती बिघडते. पण या संकटावर मात करण्यासाठी उपाय सापडलेला नाही.

Comments
Add Comment