रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गाबाबत गेल्या बऱ्याच वर्षापासून चर्चा सुरू आहेत. या महामार्गाचे गेल्या १८ वर्षांपासून काम रखडलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम पूर्ण कधी होणार? याबाबत प्रश्नांची विचारणा मुंबई ते गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. अशामध्ये मुंबई ते गोवा असा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच, येत्या २६ जानेवारीपासून हे बोगदे प्रवाशांना प्रवासासाठी सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे नवीन वर्षाच्या सुरुवातील म्हणजेच २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागचे अभियंता पंकज गोसावी यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिली आहे. त्यामुळे आता मुंबई- गोवा महामार्गावरील प्रवास हा आणखी सुखकर होणार आहे. कशेडी घाट हा या महामार्गावरचा सर्वांत अवघड आणि धोकादायक घाट आहे. अंदाजे २ किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे या घाटात तयार करण्यात आले आहेत. यामुळे ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या ८ मिनिटांमध्ये होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.