Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीमंजुरी मिळून १४ वर्षे झाली तरीही रस्ता कागदावरच; पालीत वाहतूक कोंडीचे विघ्न...

मंजुरी मिळून १४ वर्षे झाली तरीही रस्ता कागदावरच; पालीत वाहतूक कोंडीचे विघ्न कायम

गौसखान पठाण

सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी प्रचंड प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. त्यातच मागील अनेक वर्षे येथील बलाप येथून जाणारा बाह्यवळण मार्ग प्रलंबित आहे. परिणामी भाविक, पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त येत असतात. पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. बल्लाळेश्वर मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. ही वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर काही वेळेस वाहतुक पोलीस तैनात असुन देखिल अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, डबर व खडी वाहतूक करणारे डंपर, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकिचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यामुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतुक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. संध्याकाळ नंतर मात्र बऱ्याच वेळा वाहतुक पोलीस अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात नसतात. यावेळी सुद्धा बऱ्याचवेळा वाहतुक कोंडी होते. आणि कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो.

Stray Dogs : रायगड जिल्ह्यात भटक्या श्वानांची दहशत!

पाली बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळून जवळपास १४ वर्षे झाली आहेत. तरीही रस्ता कागदावरच आहे. रस्त्यासाठी १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळूनही कामाला सुरुवात झालेली नाही. वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग ५४८ (ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग ९४ला जोडला जाणारा हा बाह्यवळण मार्ग म्हणजे पाली शहरातील सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय आहे. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ हा बाह्यवळण मार्ग काढण्यात येणार आहे. जमीन हस्तांतरित करण्यासाठी काही शेतकऱ्यांचा विरोध असून त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत.

मुंबई गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले व अपुर्ण काम यामुळे येथे वाहतुक कोंडी होते. त्यामुळे मुंबई वरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळे मार्ग माणगाव वरून किंवा वाकण वरून पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाव वरुन विळे मार्गे पालीतून खोपोली मार्ग पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्ग निर्माण झाल्यास हि वाहने पालीच्या बाहेरूनच निघून जातील त्यामुळे ही वाहतूक सुरळीत होऊ शकते.

नवीन वर्षाची सुरुवात व नाताळच्या सुट्ट्यांमुळे सध्या मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची वाहने पालीमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे रस्त्यावर कोंडी होताना दिसत आहे. पालीतील महाकाली मंदिर चौक, छत्रपती संभाजीमहाराज चौक असे काही महत्त्वाचे रस्ते रुंदीकरण केले आहे. तर ग. बा. वडेर हायस्कुल व बाजारपेठेत आदी ठिकाणचे रस्त्यावर आलेली बांधकामे मागे घेतली आहेत. आणि रस्ते मोकळे केले आहेत. सर्व मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन तसेच सर्व तांत्रिक अडचणी सोडवून बाह्यवळण मार्ग केल्यास पालीतील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहन चालकांनी देखील नियमांचे पालन करावे. – प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -