लोणावळा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी केली तर काहींनी नवीन वर्षाची सुरुवात देवदेवतांच्या दर्शनाने केली. लोणावळ्याच्या एकविरा मंदिरातही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. अशातच काल एकविरा गडावर काही हुल्लडबाजांनी फटाके फोडल्याने मधमाशांनी तिथे असलेल्या भाविकांवर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि १) रोजी मुंबईच्या कुलाबा येथून दर्शनाला आलेल्या काही हुल्लडबाजांनी एकविरा गडावर कलर धुराचे फटाके फोडले. फटाक्याच्या धुराने मधमाशां इजा झाली. त्या मधमाशा सर्वत्र पसरल्या आणि गडावर आलेल्या भाविकांवर त्यांनी हल्ला केला. या माशांच्या हल्ल्याने या मुंबईकरांसह अन्य भाविकही जखमी झाले आहेत. लोणावळ्यातील एकविरा गडावर हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचेचे फटाके लावले. फटाक्यांमुळे मधमाशांच्या पोळाला इजा पोहचताच मधमाशांनी भविकांवर हल्लाबोल करत चावा घेतला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली. मधमाशांनी काही भाविकांना दंश केला. यात लहान मुलांचा देखील समावेश होता. या सर्वांना तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर तातडीने उपचार करून काहींना सोडून दिले. तर ज्यांची प्रकृती गंभीर होती अशाना काही काळ निरिक्षणाखाली ठेवून त्यांनाही घरी सोडण्यात आले आणि आराम करण्याचा सल्ला दिला.
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजवले. त्याचा फटका बाकीच्या भक्तांनाही बसला. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात. एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी, अशी मागणी कार्ला एकविरा ग्रामस्थ अशोक कुटे यांनी केली आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.