सद्गुरू वामनराव पै
मनुष्य जीवनात पुण्य हेच प्रत्येक वेळेस उपयोगी पडते. पुण्य कमी पडले की, अडचणी येतातच. जीवनात याचे अनुभव आपल्याला येतच असतात. पण तरीही आपण त्याची चिकित्सा करत नाही. कर्म आपण केलेच पाहिजे, त्याचे फळ मिळणारच आहे. पण हे फळ तुमच्या मनासारखे मिळेलच असे नाही. कारण त्याला अनेक पैलू असतात, त्यात अनेक घटक असतात. अभ्यास केलेला आहे, पण ऐन वेळी परीक्षेत विसरतो, इथे पुण्य कमी पडते.
दोन मुले मुलाखतीसाठी गेलेली असतात, दोघांचे शिक्षण, अनुभव एकसारखेच. जर दोघांच्या सर्व अपेक्षित असलेल्या गोष्टी एकसारख्या, तर निवड मात्र एकाचीच का होते? ज्याच्या गाठीपाठी पुण्य आहे, त्याचीच निवड होते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, पुण्य कमवा. गाठी व पाठी पुण्याई पाहिजे. वाडवडिलांची पुण्याई संपली की, त्यांच्यावर संकटे येऊ लागतात. वाडवडिलांची पुण्याई पाहिजे आणि आपणही पुण्याई कमवली पाहिजे. पुण्याई कमविण्याचा सोपा मार्ग संतांनी सांगितला तो म्हणजे नामस्मरण. आम्ही सांगतो प्रार्थना म्हणा. प्रार्थनेचे महत्त्व काय? प्रार्थनेने तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलते. नामस्मरणाचा प्रताप व विश्वप्रार्थनेचा प्रताप ह्यात फरक आहे तो माझ्या पुस्तकांतून सांगितलेला आहे.
Sayali Sanjiv Bold Look : ‘New Year New Me’ म्हणत केले सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर
सांगायचा मुद्दा हा की, पुण्य मिळवायचे मार्ग म्हणजे शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे. अगणित पुण्य ! अगणित पुण्य मिळविण्याचा हा सोपा मार्ग असताना कडू बोलावेच का? अनिष्ट विचार का करावे? अट्टाहासाने जे काही करायचे असेल ते चांगलेच करा, कारण त्यानंतर, तर अगणित पुण्य ! शुभ चिंतन केलेत, तर तुम्ही सुखी व्हाल, समाज सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल. उपासना कशाला म्हणतात? शुभ चिंतन हीच उपासना, हीच आराधना, हीच भक्ती आणि तेच कर्मचांग. एवढे तुम्ही केलात की, तुम्हाला हवे ते मिळेल. आता हे करायचे की नाही हे तुम्ही ठरवा. कारण, “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.