चंद्रपूर : नागपूर – चंद्रपूर मार्गावर नातेवाईकांची भेट घेऊन परतत असतांना समोरून येणार्या ट्रकवर दुचाकी आदळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.नागपूर – चंद्रपूर मार्गावरील डाली पेट्रोलपंप समोर सतीश भाऊराव नागपुरे (५१), मंजुषा सतीश नागपुरे (४७) व माहिरा राहुल नागपुरे अशी मृतकांची नावे आहे. तर स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
वणी तालुक्यातील रासाघोणसा येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथे नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. भद्रावती शहरालगत नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमधे जेवण केल्यानंतर नागपुरे कुटुंब या दुचाकीने आपल्या नातेवाईकाच्या घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणार्या या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात मंजुषा सतीश नागपुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सतीश भाऊराव नागपुरे व माहिरा राहुल नागपुरे या दोन वर्षीय बालिकेचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. या अपघातात स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.अपघाताच्या या घटनेनंतर ट्रक चालक नंदू चव्हाण रा.पुसद याला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.