हिवाळा ऋतू सर्वांना हवा हवासा वाटत असला तरी या ऋतूमधील डिसेंबर आणि जानेवारी महिने हवेतील प्रदूषणाला प्रचंड प्रमाणात पोषक असतात. सतत विविध प्रकारची कामे सुरू असलेल्या ठाणे, मुंबईसारख्या शहरांमधील हवेत धुळीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. थंड हवेमुळे वातावरणातील धूळ वर न जाता ती काही फुटांच्या अंतरावर तरंगत राहते. अशा धुळयुक्त हवेचा मानवावर, प्राण्यांवर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे धुळीसोबतच हवेतील सल्फर डायऑक्साईड, नायट्रॉजन ऑक्साईड आणि इतर विषारी घटकांचे प्रमाण वाढते. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईनगरीत वायू प्रदूषणाने इतके टोक गाठले आहे की, सध्याची प्रदूषणाची पातळी ही दिवसाला साडेतीन किंवा महिन्याला १०५ सिगारेटच्या धुराइतकी आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे गेले काही दिवस मुंबईतील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात धुरके दिसून येत आहे. हवा विषारी तर झाली आहेच; पण मुंबईचाही श्वास कोंडला आहे. परिस्थिती अशी आहे की, सततच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विषारी धुरक्यामुळे रस्त्यांची दृश्यमानता कमी झाली आहे. शहरातील दृश्यमानता दोनशे ते तीनशे मीटर इतकी कमी झाली होती, त्यामुळे जवळपासच्या गगनचुंबी इमारतीही क्वचितच दिसत होत्या. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे धुक्यामुळे गेल्या शुक्रवारी दिवसभर सूर्यदेवाचे दर्शनही झाले नाही.
मुंबई शहर आणि उपनगरातील प्रमुख ५ ठिकाणी हवा प्रचंड दूषित आहे. याशिवाय १० ठिकाणची हवा आरोग्यास घातक आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या (एक्यूआय) संकेतस्थळावरील माहितीनुसार, काल मालाड, माझगाव, नेव्हीनगर कुलाबा, सिद्धार्थनगर, वरळी आणि वांद्रे-कुर्ला संकुल-बीकेसी येथील एक्यूआय तीनशे पार गेला आहे. या ठिकाणी प्रदूषणाची पातळी अति खराब कॅटेगरीमध्ये नोंदली गेली आहे. या प्रमुख ठिकाणांसह तब्बल ठिकाणची हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० एक्यूआय दरम्यान आहे. ही पातळी आरोग्यास अपायकारक हवेच्या कॅटेगरीमध्ये मोडते. यात वांद्रे-पूर्व, बोरिवली-पूर्व, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, देवनार, जुहू, भांडूप-पश्चिम, अमेरिकन वकिलाती कार्यालय- बीकेसी, नेरूळ, सायन, विलेपार्ले आदी ठिकाणांचा समावेश आहे. कमाल तापमानामध्ये घट झाल्याने हवेतील आर्द्रता वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील धुळीचे कण त्याच स्थितीत राहतात. समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता वाढत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. हा आठवडाभर हीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे, अनियंत्रित वाहतूक व्यवस्था आदी कारणीभूत आहेत. मुंबईत सध्या एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या निर्मितीची कामे सुरू आहे. त्यात मेट्रो आणि कोस्टल रोडच्या कामाचाही समावेश आहे. याशिवाय दर अर्ध्या किलोमीटरवर गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असताना आणि जुने बांधकाम पाडताना प्रचंड धुळ उडते. तोडकाम करताना सदर जागेसभोवती हिरवा कपडासभोवती बांधण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत. मात्र फार कमी लोकांकडून त्याची अंमलबजावणी होते. मागील काही दिवसांमध्ये महापालिकेने अशा जवळपास ९०० बांधकाम ठिकाणांची पाहणी करून नियम मोडणाऱ्या २८ विकासकांवर कारवाई केली आहे.
उघड्यावर डेब्रिज वाहून नेणाऱ्या वाहनांवर महापालिकेने महिनाभरात मोठी कारवाई करताना जवळपास १२ लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. मुंबईत २५० पेक्षा अधिक स्मशानभूमी आहेत. यातील बहुतांश स्मशानभूमीमध्ये अजूनही लाकडांचा वापर केला जातो. या धुरामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने लाकूड आधारित ४१ स्मशानभूमींचे इलेक्ट्रिक किंवा पीएनजी आधारित दहनभूमीत रूपांतरण करण्यात येत आहे. भविष्यात अधिकाधिक स्मशानभूमींचे अशाप्रकारे रूपांतरण करण्याचा पालिकेचा मानस आहे. मुंबईत सध्या १२ लाखांपेक्षा जास्त खासगी कार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक नेहमी ठप्प झालेली दिसून येते. इच्छित स्थळी जाण्यासाठी दुप्पट वेळ लागत आहे. रस्त्यावर सतत धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे. अनियंत्रित वाहतूक व्यवस्थेचाही थेट परिणाम प्रदूषण वाढीवर होत आहे. समुद्रातील तापमानात घट, उंच इमारतींमुळे हवेचा बदललेला पॅटर्नही वायू प्रदूषणाला खतपाणी घालत आहे. गगनचुंबी इमारती समुद्रातील वाऱ्यांना त्यांचे काम करू देत नाहीत. ऑक्टोबर हिट आणि मान्सून परतण्यास लागलेला उशीर हेही एक कारण आहे. थंडीचे कमी-अधिक प्रमाण तसेच वाढते प्रदूषण पाहता श्वसनाशी संबंधित रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. थंडीपासून दूर राहण्यासाठी उबदार कपडे घालावेत. शक्य असल्यास थंड हवामान टाळा.
थंड पदार्थांचे सेवन मर्यादित असावे. विशेषतः कोणत्याही आजाराची लक्षणे दिसू लागल्यास न डगमगता तातडीने महापालिकेच्या किंवा खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. राजधानी दिल्लीप्रमाणे मुंबईची हवा प्रदूषित होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सतर्क आहे. हवेमधील प्रदूषणाचे प्रमाण ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने निरंतर हवा तपासणी यंत्र बसवले आहेत. याशिवाय मुंबई महापालिकेकडून रस्ते पाण्याने धुऊन काढले जात आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून हरतरेचे प्रयत्न केले जात असले तरी नियम मोडणाऱ्यांविरोधात आणखी कडक कारवाई करण्याची गरज आहे.