श्रीहरिकोटा : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात स्पॅडेक्स (Spadex Mission) या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेसाठी उलट मोजणी सुरू आहे. भारताच्या यानाचे सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी अर्थात आज रात्री नऊ वाजून ५८ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर भारत अंतराळात स्पॅडेक्स अर्थात डॉकिंग – अनडॉकिंगची क्षमता प्राप्त करणार आहे.सध्या ही क्षमता अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांकडेच आहे.
भारताच्या स्पॅडेक्स मोहिमेंतर्गत पीएसएलव्ही सी ६० रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे.या दोन उपग्रहांचे मिळून एकूण वजन सुमारे २२० किलो आहे. यापैकी एक चेझर आणि एक लक्ष्य असेल. अंतराळात डॉकिंग – अनडॉकिंग जानेवारी २०२५ मध्ये केले जाईल. हा प्रयोग पृथ्वीपासून ४७० किमी अंतरावर होईल. प्रयोगानंतर दोन्ही उपग्रह पृथ्वीभोवती दोन वर्षे फिरतील.
UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा ‘हा’ नियम; युजर्सना होणार फायदा?
उपग्रह चेझरमध्ये कॅमेरा आहे तर उपग्रह लक्ष्यात दोन पेलोड आहेत. प्रयोग यशस्वी झाल्यास इस्रोला कक्षेतून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या दिशेने जाणारा भाग पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळेल. कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पॅडेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयानं अंतराळात एकमेकांशी जोडली जातील. सोप्या भाषेत सांगायचे तर दोन्ही उपग्रह अंतराळात या तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांशी जोडले जातील.याला डॉकिंग म्हणतात. त्यानंतर, दोन्ही उपग्रह अंतराळात वेगळे होतील. याला अनडॉकिंग म्हणतात. इस्रोने ही मोहीम यशस्वी केल्यास तसे करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चौथ्या क्रमांकाचा देश होणार आहे.
स्पॅडेक्स मोहिमेसाठी दोन्ही उपग्रह ताशी २८ हजार किमी वेगाने अंतराळात प्रवास करतील. या वेगाशी जुळवून घेऊन दोन्ही उपग्रहांना जोडणे आणि वेगळे करणे हे काम पूर्ण करावे लागेल. हे करताना कुठेही टक्कर होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. भारताने स्पॅडेक्स अर्थात डॉकिंग – अनडॉकिंगची क्षमता प्राप्त केली तर भविष्यात स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याचा पर्याय भारतापुढे खुला होईल.
एकाच प्रक्षेपकातून दोन वेगवेगळ्या दिशांना प्रक्षेपित केलेले यानाचे भाग अंतराळात नेऊन तिथे जोडायचे या पद्धतीने टप्प्याटप्प्याने मोठे अंतराळ स्थानक उभारणे शक्य होते. स्पेस डॉकिंगचा हा प्रयोग अर्थात स्पॅडेक्स अमलात आणून अंतराळ स्थानक उभारून त्याद्वारे अनेक महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा आणि प्रयोग करणे शक्य आहे. भारताला भविष्यात चंद्रावर माणूस पाठवून संशोधन करायचे आहे. मंगळ ग्रहावर यानाच्या मदतीने संशोधन करायचे आहे. या दोन्ही स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्पॅडेक्स मोहीम यशस्वी होणे आवश्यक आहे. यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना चालना मिळेल. यामुळे स्पॅडेक्स मोहिमेसाठी होत असलेले प्रक्षेपण भारतासाठी महत्त्वाचे आहे.