Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजनिर्मळ आयुष्याचे स्वागत करू या...

निर्मळ आयुष्याचे स्वागत करू या…

रसिका मेंगळे

डिसेंबर महिना संपत आला की, नवीन वर्षाचे नवे कोरे वेध लागतात. सरत्या वर्षाला निरोप देऊन मनात नवीन स्वप्ने, नवीन आशा घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करू या. नवीन वर्षात आपल्या सर्व आशा, आकांक्षा पूर्ण होईल हीच इच्छा उरात बाळगून एका नव्या प्रवासाला सुरुवात करू या. नवीन वर्षाचे नवे संकल्पही केले जातात. पण काही लोक केलेले संकल्प पूर्णत्वास नेतात तर काही अर्ध्यावर सोडून देतात. अशावेळी संकल्प न करणेच योग्य असे मला वाटते. बरं संकल्प करायचा असेल तर नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांनी माणसाने माणसाशी माणसासम वागण्याचा संकल्प करणे काळाची गरज बनली आहे. आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य, आरोग्य याची भरभराट होवो. मागील दिवसाचा विचार न करता नव्या दिवसाला जोमाने कार्य करू या. सरत्या वर्षात म्हणजे २२ जानेवारी २०२४ ला अयोध्या येथे राम मंदिरात रामलीलाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सर्वांसाठी हे मंदिर खुले झाले आहे.

माझ्या लहानपणीची गोष्ट

नवीन वर्षात गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी महागाई कमी व्हावी. तसेच भ्रष्टाचार कायमचा बंद व्हावा. वाढत जाणारी बेरोजगारी कमी व्हावी. स्त्रियांवर वाढते अत्याचार कमी व्हावेत. नवीन वर्षात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुबुद्धी मिळावी. घराघरातील रक्ताची नाती टिकावीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील राजकारणी लोकांना विकासाची कामे करण्याची सवय जडावी. नवीन वर्षात तरुणांनी व्यसनांचा कायमचा त्याग करून निर्व्यसनी जीवन जगण्याचा मार्ग अंगीकारावा.

दरवर्षीप्रमाणेच हे वर्ष पण खूप काही शिकवून गेले. काही सुखाचे क्षण तर काही दुःखाचे क्षण. मात्र आपल्या भाग्याला काय आले? तर यावर्षी कोणी नवीन आपल्या आयुष्यात आलेत तर कोणी सोडून सुद्धा गेलेत. तर काही लोकांनी आपल्याला समजले, समजून घेतले, तर काहींनी समजविण्याचा प्रयत्न केला. असेच दरवर्षीप्रमाणे जाता जाता हेही वर्ष खूप काही सांगून जात आहे. पुढील वर्ष माणसाने माणुसकी जपावी यासाठी गोड शब्दांची आणि आपुलकीची गरज असते. आणि हा शुद्ध हेतू घेऊनच पुढील काळ आचरणात आणावा. आपल्या माणसांना आनंद देता येणे याहून कुठली मोठी गोष्ट नाही. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजनेची अंमलबजावणी करावी. ठिकठिकाणी चालू असलेले मेट्रोचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून गर्दी आटोक्यात आणता येईल. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचे स्वागत करताना सामान्य माणसाला अनेक उमेद आणि अनेक आशा नव्या सरकारकडून आहेत. ते पूर्ण होण्याची आशा बाळगू या.

वास्तविक नवीन वर्ष आले म्हणजे केवळ तारीख बदलत नाही. तर प्रत्येकासाठी नवीन वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद घेऊन येत असते. आता अवघे जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. या नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोगा मांडणे आवश्यक असते. कारण आयुष्यात आपण दुसऱ्यांना दिलेली आनंदाची शिदोरी हीच आपणास उपयोगी पडणार आहे. पैसा नाही एवढं मात्र नक्की. नवीन वर्षाचे स्वागत अगदी साधेपणाने कोणताही गोंधळ न घालता शांत वातावरणात ध्वनिप्रदूषण, सुरक्षा, तसेच मद्यपानाच्या नियमांचे पालन करूनच आनंदाने साजरे केले पाहिजे. सरते वर्ष २०२४ स्वच्छतेचा एक महासंकल्प घेऊन आलेला. स्वच्छता म्हटले की, डोळ्यांसमोर येतात सफाई कर्मचारी वर्ग. सफाई कर्मचारी वर्ग मुंबईचा खरा हिरो आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना सगळ्या वाईट गोष्टी, आठवणी, घाण-कचरा, अस्वच्छता सगळे आपल्याला दूर करून नव्या कोऱ्या पवित्र आणि निर्मळ आयुष्याचे, उत्साहाने स्वागत करायचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -