Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमाझ्या लहानपणीची गोष्ट

माझ्या लहानपणीची गोष्ट

गुरुनाथ तेंडुलकर

वार्षिक परीक्षा संपून निकाल लागले की मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व भावंडं गावी कोकणात जात असू. तेंडोलीला आमच्या घरी दहा-बारा दिवस राहिल्यानंतर मी आईबरोबर माझ्या आजोळी, म्हणजेच आईच्या माहेरी खानोलीला आठवडाभर राहायचो. साधारण त्याच सुमारास माझी मावशीही तिच्या दोन मुलींना घेऊन खानोलीला यायची. खानोलीला आईच्या माहेरी माझे मामा-मामी होते. मामांची मुलं होती. आजी म्हणजे माझ्या आईची आई होती आणि तिथंच होती बाय आजी. ही बायआजी म्हणजे माझ्या आईची थोरली आत्या. लग्न होऊन वर्षभरातच विधवा होऊन माहेरी परतलेली. या बायआजीचं नेमकं वय किती, ते कुणालाच ठाऊक नव्हतं. पण ती खूप म्हातारी होती एवढं मात्र नक्की. वयोमानामुळे कंबरेत किंचित वाकलेली कृश-देहयष्टी, सुरकुतलेला चेहरा. उन्हाने रापलेला काळसर वर्ण आणि या सगळ्यात भर घालणारं तिच्या अंगावरचं डोईवरून लपेटून घेतलेलं लाल आलवण… कोकणातल्या बहुतेक सगळ्या म्हाताऱ्यांप्रमाणे बायआजीदेखील तोंडानं अत्यंत फटकळ होती. ‘मेल्या, भोसडीच्या, रांडेच्या आणि क्वचित मायझंव्यां’ असल्या गोड शिव्या तिच्या तोंडात सतत असायच्या. पण तोंडात काटेरी शिव्या असल्या तरी काळजातली माया मात्र फणसाच्या गऱ्यांसारखी मधाळ होती.

माझी आई ही त्या घरातली थोरली लेक म्हणून तिच्यावर आणि पर्यायाने माझ्यावर बायआजीचा विशेष जीव होता. मुंबईच्या दोन्ही भाच्या आणि नातवंडं येणार म्हणून आठवडाभर आधीच बायआजी आमच्या मामाला सांगून आंब्याच्या करंड्या भरून ठेवायची. झाडावरून हलक्या हाताने उतरवून काढलेल्या हापूस, पायरी, मानखूर, दशेरी असे वेगवेगळ्या जातीचे आंबे गवतात भरून करंडे तयार ठेवायची. सगळे करंडे अर्थात देवघराबाजूच्या बायआजीच्या खोलीत ठेवलेले असायचे. त्या खोलीत इतर कुणालाच प्रवेश नसायचा… अगदी माझ्या आईला आणि मामीला पण… मी, मामाची मुलं आणि मावशीच्या मुली अंगणात जमायचो, दंगामस्ती करायचो. झाडांवर चढायचो. पण लपंडाव खेळताना चुकून बायआजीच्या खोलीत कुणी गेल्याचं तिला कळलं तर ती लगेच तरातरा धावत हजर व्हायची. धाप लागलेल्या तोंडानं शिव्यांची फैर झाडायची आणि मांजरीच्या पोरांना उचलून बाहेर टाकतात तशी आमच्या मानगुटीला धरून खोलीबाहेर काढायची…

आम्हाला रागही यायचा आणि गंमतही वाटायची… या बायआजीची आणखी एक चमत्कारिक सवय होती. अढीला घातलेल्या आंब्यांचे करंडे ती दररोज सकाळी उपसायची. सगळ्या करंडीतले सगळेच्या सगळे आंबे बाहेर काढून जमिनीवर पसरायची. त्यांची वर्गवारी करायची. चांगले पिकलेले, अर्धवट पिकलेले, अर्धकच्चे आणि कच्चे… या सगळ्या वर्गवारीत आणखी एक वर्ग असायचा. अति पिकून काळपटलेले… देठाकडे डागाळलेले… प्रत्येक करंडीतून असे चार-सहा डागाळलेले आंबे निघायचे. बायआजी ते आंबे बाहेर काढून उरलेले आंबे पुन्हा करंडीत भरून ठेवताना म्हणायची, ‘पोरग्यांनू, आज तुमी हे थोडेशे डागाळलेले आंबे खावा…जास्ती पिकलेले आज खावून टाका. चांगले पिकले की उद्या खावा.’ मग बायआजी आंबे चिरून त्यांचा देठाकडे डागाळलेला, काहीसा नासलेला, सडलेला-किडलेला भाग काढून उरलेला भाग आम्हाला वाढताना म्हणायची, ‘हे आंबे आजचे आजच संपवूक व्हयेत, उद्यांक रवांचे नाय. शाफ नासतले. आज हे संपवा आणि चांगले पिकलेले आंबे उद्याक खावा…’ उद्या चांगले आंबे खायला मिळणार या आशेनं आम्ही मुलं ते अति पिकलेले, सडलेले, लिबलिबीत आंबे खायचो.

दुसऱ्या दिवशीही आदल्याच दिवसाची पुनरावृत्ती व्हायची. हां हां म्हणता मामाच्या वाड्यावरचा तो आठवडा संपून जायचा आणि माझी मुंबईला घरी परतायची वेळ व्हायची. माझ्या आठवणीप्रमाणे बायआजी जिवंत असेपर्यंत वर्षानुवर्ष हाच प्रकार सुरू होता. ती जिवंत असेपर्यंत आम्ही मुलांनी मामाच्या घरी चांगला आंबा कधी उष्टावला देखील नाही. खरं तर मामाच्या मालकीची आंब्याची बाग होती. लागत्या आंब्याची शे-शंभर झाडं होती. तरीही… आता आम्ही सगळीच मुलं मोठी झालो आहोत. सर्वांची लग्नकार्य होऊन सर्वजण आपापल्या संसारात गुरफटलेत. तरीही कधीकाळी कार्यसमारंभाच्या निमित्ताने आम्ही मावस-मामे भावंडं एकत्र आलो की जुने दिवस आठवतात आणि बायआजीचीही आठवण येते.
वास्तविक प्रश्न फक्त एकच दिवसाचा होता. पहिल्याच दिवशी बायआजीने सडलेले, अति पिकलेले आंबे फेकून दिले असते तर पुढचे सगळेच दिवस आम्हाला चांगले आंबे खायला मिळाले असते. पण तसं कधीच झालं नाही. ‘उद्या चांगले आंबे खाऊया,’ असं म्हणण्याच्या तिच्या स्वभावामुळे आढीतल्या चांगल्या रसरशीत फळांची चव आम्हाला कधी चाखताच आली नाही.

आपल्या दररोजच्या व्यवहारातही अशा अनेक बायआजी आपल्याला आढळतात. ‘कालची उरलेली भाजी आधी संपवूया. आज केलेली भाजी उरली तर उद्याला खाता येईल,’ असं बायको म्हणते त्यावेळी मला हमखास बायआजी आठवते. कालची उरलेली भाजी आधी संपवायची अन् आज केलेली भाजी उद्यासाठी ठेवायची. त्यापेक्षा आज भाजी केलीच नाही तर… किंवा कालची भाजी कुणाला तरी देऊन टाकली तर तर… चांगली परिस्थिती असून देखील केवळ कोत्या मानसिकतेमुळे अनेकांना सुस्थितीचा योग्य लाभ घेताच येत नाही. नको त्या बाबतीत काटकसर केल्यामुळे आयुष्यातील अनेक सुखांवर कायमची ‘काट’ मारली जाते आणि आनंदाला ‘कसर’ लागते. अनेकदा तर ही काट-कसर करून त्याचा फायदा कुणालाच होत नाही. भतृहरी त्यांच्या नीतिशतकात म्हणतात.

दानं भोगो नाश तख्त्री गती भवति वित्तस्य । यो न ददाति न भुक्ते तस्य तृतिया गर्तिभवति ।।

अर्थ : संपत्ती तीन प्रकारे संपते. पहिला प्रकार म्हणजे दान करून, दुसरा उपभोग घेऊन, तिसरा प्रकार म्हणजे सडून नाश पावल्याने. जो पहिले दोन प्रकार करीत नाही त्याची संपत्ती तिसऱ्या प्रकारे म्हणजेच सडून नाश पावते. म्हातारपणासाठी तरतूद म्हणून तरुण आयुष्यातले सर्व सोनेरी दिवस काळे केले की पुढचे येणारे दिवसही काळेच उगवतात… सरकारी नोकरीत असताना क्वार्टरमध्ये राहणारी माणसं.’ ही जागा आपल्याला रिटायर्डमेंटनंतर सोडावीच लागणार आहे…’ असा विचार करून तीस तीस वर्षे घराला रंग न लावता विटलेल्या भिंती पाहत आयुष्य काढताना मी स्वतः पाहिली आहेत. ‘या साडीची घडी कधीतरी चांगल्या कार्यप्रसंगाच्या निमित्ताने मोडू’ असे म्हणून वर्षानुवर्ष न वापरता जपून ठेवलेली साडी, घडी न मोडता घडीवरच विरून वाया जाते. उद्याची काळजी न करता आजच्या दिवसाचा बेदरकारपणे उपभोग घेणे किंवा ऋण काढून सण साजरा करणे जसे चुकीचे आहे, तसेच उद्याच्या दिवसासाठी अति काटकसर करून आजचा दिवस नासवणे हे देखील चुकीचेच आहे. काटकसरीचा अतिरेक केल्यामुळे, ‘ना तुला, ना मला, घाल कुत्र्याला,’ अशी अवस्था झाल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून पै-पै साठवणाऱ्या माणसाची पूंजी तो मेल्यानंतर भलताच कुणीतरी उडवताना आपण पाहतो हे सांगताना सुभाषितकार पुन्हा सांगतात.

पिपीलिकार्जितं धान्यम् मक्षिकासंचितम् मधू। लुब्धेन संचितो द्रव्यो समूलंच विनष्यति।।
मुंगी उपाशी राहून कणकणाने वारुळात धान्य साठवते, त्या वारुळावर नाग एका क्षणात ताबा मिळवतो. मधमाशी अनेक प्रकारे कष्ट करून रानावनातून फुलांफुलांतून मध गोळा करते. स्वतः न खाता पोळ्यात साठवते आणि एके दिवशी भलताच कुणीतरी तो मध घेऊन पसार होतो. लोभी माणसाच्या धनाची अवस्थाही अशीच होते… म्हणूनच दैनंदिन व्यवहारात वागताना काटकसर आणि कद्रूपणा यांमधली सीमारेषा तारतम्य बाळगून आपली आपणच नीट ठरवायला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -