Saturday, October 18, 2025
Happy Diwali

‘‘बाय बाय २०२४’’

‘‘बाय बाय २०२४’’

मृदुला घोडके

हाहा म्हणता २०२४ वर्ष संपत आलं. नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळे आतूर झालो आहोत. नववर्षाची चाहूल लागताच काय संकल्प करायचा हेही विचार मनात उसळी मारू लागतात. आता दरवर्षीच असे अनेक संकल्प आपण करतो आणि ते कधी मावळतात हे आपल्याला समजतही नाही. आता २०२४ ला निरोप देत असताना, नवसंकल्प काय करावा बरे? मला वाटतं, नवीन वर्षात मला माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला आवडेल. म्हणजे स्वतःच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक आरोग्याची काळजी घ्यायला. समुपदेशन क्षेत्रात असल्यामुळे मला स्वतःची संपूर्ण काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे माहिती आहे. कारण माझं मन सुदृढ असेल तर माझं शरीरही सुदृढ राहील. मन आणि शरीर सुदृढ असेल तर मला स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठीही काही करता येईल. माझे विचार सकारात्मक असतील तर जीवनातली आव्हानं पेलता येतील... मी दुसऱ्यांप्रती संवेदनशील बनू शकेल. माझ्या स्वतःच्या भावनांप्रती जागरूक राहू शकेन... आत्मसंयमन करू शकेन. जीवनात मी किती भाग्यवान आहे हे समजू शकेल आणि मला काय काय मिळालं आहे, माझ्याकडे जे काही आहे त्याबाबत कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. २०२४ मध्ये मी काय गमावलं त्यापेक्षा २०२४ ने मला काय दिले याची मला जाणीव होईल आणि मी देवाचे आभार मानू शकेन.

एक गोष्ट आठवली... एक लहान दृष्टीबाधित मुलगा, रस्त्याच्या कडेला भीक मागत बसला होता. त्याच्या हातात एक पाटी होती. त्यावर लिहिलं होतं, “मी आंधळा आहे. कृपया मला मदत करा.” त्या रस्त्यावर येणारे-जाणारे लोक त्या मुलापुढे ठेवलेल्या छोट्या वाडग्यात पैसे टाकून पुढे जायचे. एकदा एक माणूस त्या मुलाजवळ आला. त्याने काही पैसे त्या मुलाच्या वाडग्यात टाकले आणि त्या मुलाची पाटी हातात घेऊन उलटी फिरवून त्यावर काही लिहिलं. त्या अंध मुलाच्या हातात ती पाटी परत देऊन तो माणूस तिथून पुढे गेला. थोड्याच वेळात त्या वाडग्यात पडणाऱ्या नाण्यांचा आवाज आणि नोटांच्या सरसरीवरून त्या मुलाला कळलं की ते वाडगं गच्च भरून गेलं आहे. मुलगा खूप आनंदी झाला. त्याच्या कानावर पडणाऱ्या बुटांच्या आवाजावरून त्यानं ओळखलं की पाटीवर काहीतरी लिहिणारा माणूस परत तिथे आला आहे. मुलगा म्हणाला, “ काका, तुम्हीच माझी ही पाटी घेऊन त्यावर लिहिलं ना? असं काय लिहिलं तुम्ही?”

“मुला मी पाटीवर फक्त सत्य लिहिलं होतं... पण वेगळ्या शब्दात... मी लिहिलं...” आजचा दिवस किती सुंदर आहे... पण मी हा दिवस पाहू शकत नाही.”

पाटीच्या दोन्ही बाजूला सत्यच लिहिलं होतं. पाटीवर आधी मुलगा अंध असल्याचं सत्य होतं. पण दुसऱ्या बाजूला त्या माणसानं जे लिहिलं होतं त्यामुळे आपल्याला दृष्टी असल्याबद्दल लोकांचे कृतज्ञ भाव नकळत व्यक्त होत होते. जीवनात अशा अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो. आपल्यापैकी काही लोकांसाठी २०२४ हे वर्ष कदाचित अडचणीचं गेलं असेल. कुणी काही तरी गमावलं असेल. कुणाचं मोठं नुकसान झालं असेल. कुणाच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली असेल. अशावेळी कृतज्ञ कशाप्रती राहायचं असे विचार मनात येत असतील. खूप निराशा वाटत असेल. पण त्याचवेळी मन थोडं शांत करून विचार केला की सर्वच वाईट झालंय का? काहीच चांगलं घडलं नाही का? घडलेल्या चांगल्या घटना आपण गृहीत धरतो का? एका इंग्रजी स्तंभलेखात आलेला मजकूर मला आठवला...

“मी कृतज्ञ आहे, माझ्या घोरणाऱ्या जोडीदाराबद्दल, कारण रात्रीच्या गडद अंधारात त्याचं अस्तित्व मला धीर देतं.” “ मी कृतज्ञ आहे, खाण्याची नवनवीन फरमाईश करून मला बेजार करणाऱ्या माझ्या मुलांबद्दल, कारण ते माझ्यावर विश्वास आणि प्रेम दाखवतात.” “मी कृतज्ञ आहे, मला प्राप्ती कर भरावा लागतो याबद्दल, कारण मी माझी मिळकत तेवढी आहे हे मला समजतं.” “ मी कृतज्ञ आहे, रात्री पलंगावर अंग टाकल्यावर अचानक पाठीतून उठणाऱ्या वेदनेबद्दल, कारण मी मेहनत करू शकते, व्हील चेअरवर बसण्याची वेळ आली नाही याची जाणीव झाल्याबद्दल.” “मी कृतज्ञ आहे, मला घराची स्वच्छ्ता करावी लागते, कारण माझ्याकडे माझं घर आहे.” “ मी कृतज्ञ आहे, आगाऊपणे... माझी चौकशी करणाऱ्या माझ्या शेजाऱ्यांबद्दल, कारण कुणीतरी विचारणारं आहे.” “मी कृतज्ञ आहे, सकाळी माझी झोपमोड करणाऱ्या त्या अलार्मबद्दल, कारण माझ्या आयुष्यात मी आणखी एक नवीन दिवस पाहिला आहे.”

कृतज्ञता किती चांगली भावना आहे नाही? एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल, आपल्याकडे जे काही आहे त्याबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त करून बघा... एक वेगळेच समाधान, शांतीचा अनुभव मिळेल.

Comments
Add Comment