भालचंद्र ठोंबरे
देवांचे गुरू होण्याची इच्छा असूनही दैत्याचे गुरू झालेल्या शुक्राचार्यांची ही कथा आहे. शुक्राचार्य यांचा जन्म भृगू पत्नी दिव्या (हिरण्य कश्यपूची कन्या. काही ठिकाणी काव्यमाता, ख्याती असाही उल्लेख आहे) हिच्या पोटी श्रावण महिन्यात शुक्ल अष्टमीला झाल्याचे मानले जाते. त्यांचे जन्म नाव शुक्र, उशनस होते. जन्मानंतर विद्यार्जनासाठी त्यांना ब्रह्मदेवाचे पुत्र अंगीरस ऋषीकडे भृगुंनी पाठविले. अंगीरस पुत्र बृहस्पती हे सुद्धा शुक्राचार्य यांच्यासोबत विद्यार्जन करीत होते. शुक्राचार्य बुद्धिमान व हुशार होते. मात्र अंगीरसांचा कल बृहस्पतीकडे आहे हे पाहून शुक्राचार्य अंगीरसाचा आश्रम सोडून गौतम ऋषींकडे विद्यार्जनासाठी गेले. शुक्राचार्यांची उपेक्षा विद्यार्जनानंतर बृहस्पती व शुक्राचार्य देवगुरूच्या पदासाठी इंद्राकडे गेले असता, इंद्राने राक्षस कन्येच्या पोटी जन्मलेला पुत्र देव गुरू होऊ शकत नाही असे म्हणून शुक्राचार्यांना नाकारून बृहस्पतींना देवगुरू म्हणून नेमले. या अपमानामुळे त्यांनी दैत्यांचा गुरू होण्याचे ठरविले. भृगूंचा श्रीविष्णूला शाप
समुद्र मंथनानंतर अमृत मिळाल्यामुळे देव प्रबळ झाले. अशा वेळेस असुराकडेही पर्यायी प्रभावी शस्त्र असावे यासाठी शिव पुराणानुसार शुक्राचार्यांनी महादेवाची तपश्चर्या केली. शुक्राचार्य तपश्चर्येत असताना देवांनी असुरांशी युद्ध केले. त्यावेळेला असुरांना भृगू पत्नी दिव्याने आश्रय दिला. त्यामुळे विष्णूने सुदर्शन चक्राच्या साह्याने दिव्याचा वध केला. हे ऐकून भृगुऋषींनी विष्णूला पृथ्वीवर सतत जन्म घेऊन त्रास भोगण्याचा शाप दिला. शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र प्राप्ती शुक्राचार्यांच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या महादेवांना शुक्राचाऱ्यांनी मृत संजीवनी मंत्राची मागणी केली. या मंत्राचा दुरुपयोग होणार नाही या अटीवर महादेवाने शुक्राचार्यांना मृत संजीवनी मंत्र दिला. मात्र शुक्राचार्य हा मंत्र देव व असुर यांच्या युद्धात मरण पावलेल्या असुरांना पुन्हा जीवित करण्यासाठी वापरू लागले. त्यामुळे असुरांचे बल कमी न होता कायम राहिले. त्यामुळे देव हताश झाले. तेव्हा शंकरांना राग येऊन शंकरांनी शुक्राचार्यांना गिळून टाकले. अशाप्रकारे अनेक वर्षे शुक्राचार्य शंकराच्या पोटी राहिले. पुढे ते शंकराच्या लिंगातून शुक्राणूच्या रूपात बाहेर पडले आणि म्हणून त्यांना शुक्राचार्य म्हणू् लागले. अशीही आख्यायिका आहे. शुक्राचार्यांना पाहून शंकरांना पुन्हा राग आला व ते त्यांना मारण्यास धावले. तेव्हा शुक्राचार्य माता पार्वतीला शरण गेले. पार्वतीने महादेवांना समजावून त्यांचा राग शांत केला व शुक्र आता तुमच्या शरीरातूनच आल्याने ते तुम्हाला पुत्रासमान आहेत, असे सांगून समजावले. अखेर शंकराचा राग शांत झाला व त्यांनी शुक्राला आपला पुत्र म्हणून स्वीकारले. कचाला मंत्राची प्राप्ती शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येमुळे असुरांचे बल कायम राहू लागले व त्यामुळे देव हताश झाले. इंद्रांनी आपली मुलगी जयंतीचा विवाह शुक्राचार्यांशी लावून दिला. जयंतीपासून त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव देवयानी होते.
अखेर देवांनी बृहस्पतीचा मुलगा कच याला शुक्राचार्यांकडेच संजीवनी विद्या शिकण्यासाठी पाठविले. कच हा बृहस्पतींचा मुलगा असून कोणत्या उद्देशाने आलेला आहे हे शुक्राचार्यांना माहीत असतानाही, त्यांनी त्याला आपला शिष्य म्हणून पत्करले. शुक्राचार्यांची मुलगी देवयानीचे कच यावर प्रेम जडले. मात्र कचाचा हेतू माहीत असल्याने असुरगण कचाचा द्वेष करीत असत. त्यांनी कचाला दोन वेळा निरनिराळ्या प्रकारे ठार केले. मात्र कन्येच्या प्रेमापोटी शुक्राचार्यांनी कचाला प्रत्येक वेळी पुन्हा जिवंत केले. अखेर असुरांनी शेवटी कचाला मारून त्याला जाळून त्याची राख शुक्राचार्यांना पेया वाटे पाजली. संध्याकाळपर्यंत कच आश्रमात परत न आल्याने शुक्राचार्यांनी आपल्या तपोबलाच्या साह्याने तू कोठे आहेस असा आवाज दिला तेव्हा त्यांच्या पोटातूनच गुरुदेव मी येथे आहे असा कचाचा आवाज आला. आता कचाला परत बोलवणे म्हणजे शुक्राचार्यांचे मरण स्पष्ट होते. पण देवयानीच्या हट्टामुळे त्यांनी कचाला प्रथम संजीवनी मंत्र शिकविला व कचाला बाहेर येण्यास सांगितले. कच बाहेर येताच शुक्राचार्य मरण पावले, मात्र कचाने बाहेर येऊन संजीवनी मंत्राच्या साह्याने त्यांना जिवंत केले. अशाप्रकारे कचाला संजीवनी विद्या मिळाली. कच देवयानीचा परस्परांना शाप
कच जिवंत झाल्याचे पाहून देवयानीला आनंद झाला. तिने त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला; परंतु आता आपण भाऊ-बहीण झाल्याने हा विवाह होऊ शकत नाही असे कचाने सांगितले. हे ऐकून देवयानीला क्रोध आला व तिने कचाला तू शिकलेल्या संजीवनी विद्येचा तुला कोणताही उपयोग होणार नाही असा शाप दिला.(तसेच संजीवनी मंत्र हा कच आणि देवयानी यांना कळल्याने षटकर्णी झाल्यामुळे लोप पावला. अशीही आख्यायिका आहे.) कचानेही तिला कोणताही ऋषी कुमार तुझ्याशी विवाह करणार नाही असा शाप दिला. अखेर देवयानीचा विवाह क्षत्रिय राजा ययातीशी झाला. झारीतील शुक्राचार्य शुक्राचार्य नेहमी असुरांना त्यांच्या हिताचाच उपदेश करीत असत; परंतु आपल्या कठोर वर्तनाने असूर त्याकडे दुर्लक्ष करीत असत. असूर महाराजा बळीकडे श्रीविष्णूंनी बटू वामन रूपात येऊन केवळ तीन पावले एवढ्या जागेची मागणी केली. बटू रूपातील विष्णूला ओळखून शुक्राचार्यांनी बळीला या दानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र बळी आपल्या वचनावर ठाम राहणार असे दिसल्यावर शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेऊन झारीतील तोटीत पाणी अडवून बसले. तेव्हा बलीने (काही ठिकाणी बटू वामनाने असाही उल्लेख आहे.) एक दर्भ झारीच्या छिद्रात घातला. हा दर्भ शुक्राचार्यांच्या डोळ्यांत टोचल्याने त्यांचा डोळा फुटला व ते एका डोळ्यांनी अधू झाले व तोटीतून बाहेर आले. अशाप्रकारे विष्णूला दान देण्यातला अडथळा दूर झाला व बळीने आपले वचन पूर्ण केले. त्यायोगे श्रीविष्णूंनी बळीला पाताळात धाडले. या घटनेचा संदर्भ घेऊन एखाद्याला काही देण्याच्या मार्गात अटकाव किंवा अडथळा निर्माण करणाऱ्याला झारीतील शुक्राचार्य असे संबोधण्याचा प्रघात पडला. या घटनेनंतर शुक्राचार्य आपला मुलगा (पुतण्या?) आर्विसह सध्याच्या अरबस्तान नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात राहावयास गेले. शुक्राचार्यांची तपोभूमी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बेट ही शुक्राचार्यांची कर्मभूमी, तपोभूमी असल्याचे मानले जाते. तेथे गोदावरी नदीच्या एका तीरावर शुक्राचार्यांचा आश्रम होता, तर दुसऱ्या तीरावर कच व अन्य शिष्य राहात असत. गुरूच्या सेवेसाठी शिष्यांना नदीतून यावे लागत असे तेव्हा शुक्राचार्य यांनी आपल्या कोपराच्या साह्याने नदीचे पात्र बदलविले व शिष्यांना मार्ग करून दिला, अशी आख्याखिका आहे. या ठिकाणी झालेल्या वस्तीला कोपरगाव हे नाव मिळाले, असेही मानले जाते. या ठिकाणी शुक्राचार्यांचे मंदिर व शुक्राचार्य व कच संदर्भातील ठिकाणे आहेत. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या कोणत्याही शुभ कार्यासाठी कोणताही शुभमुहूर्त, नक्षत्र, वेळ पाहण्याची आवश्यकता नाही, असेही मानले जाते.